फेफ न्यूज प्रकरणी मुख्य सुत्रधारावर कारवाई करावी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाटील पिता पुत्रावर आरोप
फेफ न्यूज प्रकरणी मुख्य सुत्रधारावर कारवाई करावी
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाटील पिता पुत्रावर आरोप
शिवसेना (ठाकरे) - धाराशिव नगर परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दि.३० नोव्हेंबर रोजी भाजपच्या उमेदवार कुठेच नसताना भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा काकडे ३८ टक्के मत घेऊन एक नंबरला, तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या परविन कुरेशी ३७ टक्के मते घेऊन दोन नंबरला आणि शिवसेना (ठाकरे) च्या उमेदवार संगीता गुरव या तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे धाराशिव 2.0 या फेसबुक पेजवरुन फेक न्यूज पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई करीत धाराशिव 2.0 च्या एडमिनवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणी मुख्य मास्टरमाइंड कोण आहे ? याचा शोध घ्यावा. तसेच धाराशिव 2.0 चा एडमिन हा आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व धाराशिव 2.0 यांचे मोबाईल जप्त करून त्यांचे सीडीआर तपासावेत असे सांगत शिवसेना (ठाकरे) चे युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी धाराशिव शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी संयुक्तरित्या पाटील पिता-पुत्रांवर थेट गंभीर आरोप दि.१३ डिसेंबर रोजी केले.
पवनराजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे उपस्थित होते. पुढे बोलताना सुर्यवंशी म्हणाली की, फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल माध्यमांवर धाराशिव 2.0, ऑल अबाऊट धाराशिव व धाराशिव जिल्हा या पेजवरून फेक न्यूज पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याबाबत संपर्क केला. मात्र तो होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर घडलेला प्रकार सांगून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद निवडणूक अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा शेरा मारला. मात्र, अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे निवडणूक निर्णय आयोगाकडे आम्ही धाव घेतली व त्यांना तक्रारी अर्जासोबत पुरावे देखील दाखल केले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना स्वयं स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, कागदोपत्री खेळ करीत डिसाळ कारभार करीत कारवाई होत नसल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्याकडे आम्ही धाव घेतली व सर्व प्रकार त्यांना दाखविला. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पत्र काढून निवडणूक विभागाला गुन्हे दाखल करण्याचे कळविले. त्यानंतर देखील निवडणूक आचार संहिता कक्ष प्रमुख विश्वंभर वासुदेव सोनखेडकर यांनी फिर्यादीमध्ये माझे नाव नको सांगत फिर्याद देण्यासाठी टाळाटाळ चालवली. मात्र सर्वत्र दबाव निर्माण झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी तो व्हिडिओ कोणी तयार केला ? कोणाच्या मोबाईल वरून पाठविण्यात आला ? त्याचा मास्टरमाइंड कोण याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे गुरव व सुर्यवंशी यांनी सांगितले. तसेच २००४ साली देखील विधानसभा निवडणुकी दरम्यान पवन राजेनिंबाळकर यांचा डॉ. पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा असल्याची खोट्या पेपरमध्ये खोटी बातमी छापून आणल्याचा आरोपी त्यांनी केला. त्यामुळे विरोधक सतत रडीचा डाव खेळत असल्याचा गंभीर आरोप गुरव व सुर्यवंशी यांनी केला.