धाराशिव नगर परिषद ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी काळेबेरे केले ! परस्परच ईव्हीएम मशीनची टेस्टिंग सुरु ? दोन्ही शिवसेना आक्रमकपणे आल्या एकत्र !

धाराशिव नगर परिषद ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी काळेबेरे केले !

परस्परच ईव्हीएम मशीनची टेस्टिंग सुरु ?

दोन्ही शिवसेना आक्रमकपणे आल्या एकत्र !

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - राज्यात नगर परिषद निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. ज्या नगरपरिषदेमधील उमेदवारांची प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत, अशा नगरसेवक पदांच्या निवडणुका दि.२० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. मात्र ज्या ठिकाणी मतदान झाले आहे, त्या उमेदवारांच्या मतपेट्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवलेल्या आहेत. त्याला लागूनच आगामी होणाऱ्या मतदानासाठी ज्या ईव्हीएम मशीन आहेत, त्या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी (FLT) टेस्टिंग दि.९ डिसेंबर रोजी केली गेली. त्यामुळे त्या मशीन चा आवाज येत होता. याबाबत संबंधित राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढलेल्या उमेदवारांना याबाबत कळविले नाही. त्यामुळे या ठिकाणी अनागोंदी व भोंगळ कारभार सुरू असल्यामुळे मतदान झालेल्या मशीनमध्ये काहीतरी काळेबेरे केले आहे का ? असा संशय व्यक्त करीत शिवसेना (ठाकरे) व शिवसेना (शिंदे) या दोन्हींनी एकत्रितपणे आरोप घेत आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या नगर परिषद निवडणुकीवर विशेषतः ईव्हीएम मशीनवरच त्यांनी थेट संशय व्यक्त केल्यामुळे खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक या पदांसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, तीन प्रभागांमध्ये निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने ती प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या तीन प्रभागातील निवडणुका दि.२० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान झालेल्या ठिकाणची मतमोजणी रखडलेली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ज्या ईव्हीएम मशीनमध्ये मतदान घेण्यात आलेले आहे. त्या ईव्हीएम मशीन शासकीय आयटीआयमधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. दरम्यान, उर्वरित तीन प्रभागातील मतदानासाठी नवीन ईव्हीएम आहेत त्याची टेस्टिंग स्ट्रॉंग रूमपासून अवघ्या ५० फूट अंतरावरच केली. या टेस्टिंग बाबत सर्व राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी व उमेदवारांना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीमध्येच ही टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. यापूर्वी लोकसभा व विधानसभेसाठी अशा पद्धतीची प्रक्रिया राबविताना संमती त्यांना पूर्वकल्पना देऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये ती राबवली होती. मात्र, दि.९ डिसेंबर रोजी निवडणूक विभागाने यापैकी कुठलाही सोपास्कार पार पाडलेले नाहीत. त्यामुळे हा सर्व अनागोंदी व भोंगळ कारभार चालू असून मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनमध्येच काहीतरी काळेबेरे केले असल्याचा संशय दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही प्रक्रिया वाद्याच्या भोवऱ्यात सापडली असून या निवडणूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

.........

दुपारी साडेबारा वाजल्यापासून धाराशिव नगर नगर परिषद अंतर्गत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन्स ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. अगदी त्या लगत फक्त ५० फूट अंतरावरच तीन प्रभागासाठी मतदान घेण्यात येणाऱ्या मशीनची (FLT) टेस्टिंग सुरु आहे. याची कल्पना संबंधित राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व उमेदवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगणे आवश्यक असते. तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये  मशीनची टेस्टिंग करणे बंधनकारक असते. मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणालाही कळविले नाही. आम्ही या ठिकाणी येऊन पाहणी केली असता मशीन चा आवाज येत आहे. त्यामुळे आम्ही त्याची फुटेज मागितली तर लाईट गेली असे कारण सांगून ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजची मागणी करुन शहानिशा करणार आहे. विशेष म्हणजे मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. तसेच आमचे लोक या ठिकाणी बसणार आणि या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

........

नगराध्यक्ष व ज्या नगरसेवकांसाठी दि.२ डिसेंबर रोजी निवडणूक झालेली आहे. त्या ईव्हीएम मशीन म्हणजे मत पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहेत. याला लागूनच ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू आहे. मात्र, याबाबत कोणालाही कळविलेले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना फोनवरून विचारले असता ते म्हणाले की, मला काही माहीत नाही. तुम्हाला कळविले असेल असे मला वाटले, असे देशमुख यांनी सांगितले. परंतू ,आम्हाला कळविले नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष यांना बोलावून घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएम मशीनची टेस्टिंग प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी १०० टक्के अनागोंदी व भोंगळ कारभार चालू असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहराध्यक्ष सोमनाथ भारती गुरव यांनी केला. तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे. कारण या ठिकाणी काहीतरी काळेबेरे चालू आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढविलेली आहे, ते या ठिकाणी भेट देतात. ईव्हीएम मशीनचे सील व्यवस्थित आहे की नाही ? ते चेक करतात. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून आवाज येत आहे याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णता डोळेझाक करीत आहेत. विशेष म्हणजे येथील लाईट गेलेली आहे. स्क्रीन बंद आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत असे असताना देखील अधिकारी येथील रेकॉर्डिंग चालू असल्याचे सांगतात. त्यामुळे दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्यावेळी ठेवल्या तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळायला पाहिजे अशी मागणी गुरव यांनी केली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट !कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले