एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार - आ. पाटील

एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार - आ. पाटील


धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - नागपूर येथील एम्सचे तज्ञ आता दर पंधरा दिवसाला धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेणार आहेत. तर काही सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर दररोज एक तास त्यांचा अमूल्य वेळ रुग्ण उपचारासाठी देणार आहेत. एम्स आणि आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराच्या मसुद्याला राज्य शासनानेही आता मंजुरी दिली आहे. त्यामुळे एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन असावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.१२ डिसेंबर रोजी दिली.

नागपूर येथील एम्स संस्थेस भेट देऊन एम्स आणि धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला. यावेळी यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्रसिंह चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आदी उपस्थित होते. एम्सच्या सहकार्यातून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वर्ग घेतले जात असून दर पंधरा दिवसाला एम्सचे अनुभवी तज्ञ लेक्चर देणार आहेत. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना एम्समधील तज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन, अद्ययावत माहिती आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण लाभणार असून कर्मचाऱ्यांनाही एम्समध्ये कशा प्रकारे रुग्णसेवा आणि व्यवस्थापन चालते ? याचे व्यावहारिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर मंडळींचे मोठे सहकार्य लाभणार आहे. तर ते डॉक्टर टेलिमेडिसिनच्या माध्यमातूनही महाविद्यालयाच्या संपर्कात असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि अद्यावत उपचार देण्यासाठी आपल्या डॉक्टर मंडळीला मोठे सहकार्य लाभणार आहे. काही गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी एम्सने अधिकृतपणे आपल्याला मान्यता दिली आहे. आवश्यकतेनुसार काही रुग्णांना थेट नागपूर येथे नेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे अद्ययावत शिक्षण मिळावे. यासाठी एम्सच्या धर्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याला जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. तसेच विधानसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहातच वरील माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराचा फायदा थेट विद्यार्थ्यांसह जिल्हा आणि परिसरातील रुग्णांनाही होणार असल्याचा विश्वास इ पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट !कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले