आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासासाठी फ्लॅगशिपची जिल्हाधिकाऱ्या समवेत बैठक
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - आकांक्षीत जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या दिलेल्या निकषांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे काम फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत ६ सामाजिक संस्था जिल्ह्यातील १२० गावांमध्ये करत आहेत. या अंतर्गत कृषी, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, पशुसंवर्धन व कौशल्य विकास या कामावर जोर दिला असून ती कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आजपर्यंत या माध्यमातून पायाभूत सुविधा कशा सक्षम कराव्यात ? याचे प्रात्यक्षिक करून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्याचे महत्त्वाचे काम या संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या उपस्थितीत दि.१० डिसेंबर रोजी आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आकांक्षीत जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी इंडसइंड बँकेच्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक चिन्मय दास, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मोरे, वामिवचे जिल्हा समन्वयक सुखदेव चिंचोलीकर, इंडसइंड बँकेच्या प्रकल्प प्रमुख तेजश्री वाडीवकर, वाटर शेडचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत कवठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी पी व्ही गोडसे, अटल भूजल चे रवींद्र मांजरमकर, पशुसंवर्धनचे वैभव पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत गेल्या चार वर्षांपासून करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी पुजार यांनी घेतला. आजपर्यंत केलेले काम सकारात्मक व समाधानकारक असून या कामामध्ये सातत्य ठेवण्यासह कामात गती वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात कृषी पर्यटन करण्यासाठी शेतकऱ्यांना तशा पद्धतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी पर्यटनाचे महत्त्व समजावून सांगावे असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्ह्यात खाजगी भागीदारीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये विकास करण्यावर भर द्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीस कृषी विभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग, अटल भूजल विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी तसेच संपदा ट्रस्ट, एन पॉवर, ओपन लिंक फाउंडेशन, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि स्वस्ती ऑर्गनायझेशनचे अधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.