दिव्यांगांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नयेत - पुजार
- Get link
- X
- Other Apps
दिव्यांगांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नयेत - पुजार
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले आहे. दिव्यांग हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि.१० डिसेंबर रोजी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ३९ अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण समितीचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, नवजीवन अपंग प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पा ढोके व प्रहार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मयूर काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना पुजार म्हणाले की, विविध योजनांचे अभिसरण करून दिव्यांगांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. विविध आरोग्य विषयक शिबिरांचे त्यांच्यासाठी आयोजन करण्यात येत असून यामधून त्यांना दिव्यांग वैश्विक ओळखपत्र देण्यात येत आहे. दिव्यांगांना लागणाऱ्या सहाय्यक उपकरणांसाठी शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग योजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून पुजार म्हणाले की, दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठी त्यांना कौशल्य विषयक प्रशिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक कार्यालयात त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. ग्रामपंचायतला देण्यात येणारा ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा. त्यांना घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. तर न्या. पाटील म्हणाल्या की, प्रशासन हे दिव्यांगाबाबत सजग आहे. हे आजच्या कार्यशाळेतून दिसून येते. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत असतील तर त्या दूर करून त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. समाजात सकारात्मकता जागरूक ठेवण्याचे काम दिव्यांग करत आहेत. मोफत विधी सेवा देऊन काम संपत नाही तर समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुरेश पाटील म्हणाले की, शासनाच्या दिव्यांगांसाठी विविध योजना आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. २०१६ मध्ये आलेल्या दिव्यांग हक्क अधिनियमात २१ प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. आज अनेक दिव्यांग व्यक्ती असे आहेत की, ज्यांच्याकडे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र नाही, ते त्यांना मिळून दिले पाहिजे. शासनाने विविध विभागाच्या मदतीने दिव्यांगाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ६ टक्के दिव्यांग व्यक्ती आहेत. हा घटक वंचित व दुर्लक्ष राहीला. आता त्यांना दुर्लक्षित वंचित ठेवता येणार नाही. समाजाने या घटकाकडे संवेदनशीलतेने बघितले पाहिजे. दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समान असला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर दिव्यांगांना योग्य वागणूक मिळाली नाही तर शिक्षेची तरतूद सुद्धा असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, त्यामुळे या विषयाकडे संवेदनशीलतेने बघण्याची आवश्यकता आहे. दिव्यांगाना विविध कार्यालयात जाण्यासाठी रॅम्स व लिफ्टची सुविधा असली पाहिजे.आपल्या अवतीभवती दिव्यांगांच्या अनेक समस्या असल्याचे दिसून येईल. दिव्यांगाना मदत करण्यासाठी आपण सहाय्यभूत ठरलो पाहिजे,असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ.हरिदास म्हणाले की, जिल्ह्यात ज्या व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड काढणे बाकी आहे, त्यांनी तात्काळ आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांनी के-वायसी करावी. आयुष्यमान कार्ड सर्वांना काढता येतात. या कार्डमुळे ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार खाजगी रुग्णालयात देखील मोफत मिळणार आहे. कुटुंबांसाठी एक आणि वृद्ध व्यक्तींसाठी वेगळे कार्ड काढता येतात. दिव्यंगत्व जन्मजात येऊच नये यासाठी मुल पोटात असतानाच काळजी घेतली पाहिजे. टिनऐजमध्ये जीवनशैलीची दक्षता घेतली पाहिजे. रक्तक्षयाचे प्रमाण आज वाढले आहे. मुलींमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने जन्माला येणारे बालक हे देखील विकलांग असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळ जन्माला येण्याआधी त्याचे दिव्यांगत्व टाळण्याचा प्रयत्न करण्यात येते, असे त्यांनी सांगितले. तर अस्थिरोग तज्ञ डॉ.संतोष पाटील म्हणाले की, तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगाची तपासणी एका निश्चित तारखेला करण्यात येते. दिव्यांग व्यक्तीचे वैश्विक दिव्यांगत्व ओळखपत्र काढले पाहिजे, ज्यांनी काढले नसतील त्यांना ते कार्ड काढण्यासाठी मदत करावी. दिव्यांग व्यक्तीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.केवळ ४० टक्के दिव्यांग व्यक्तीला नाही तर त्यापेक्षा कमी दिव्यांगत्व प्रमाण असलेल्या व्यक्तीला सुद्धा दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे व विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना विविध योजनांची माहिती दिली पाहिजे, असं त्यांनी सांगितले. तसेच
दुपारच्या सत्रात समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी सांगितले की,दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज आहे.दिव्यांगांना मदत करण्यासाठी सकारात्मक भावनेतून काम करणे आवश्यक असल्याचेत्यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गुरव यांनी त्यांच्या विविध योजनांची माहिती देऊन दिव्यांग बांधवांनी कौशल्यविषयक प्रशिक्षण घेऊन रोजगार उभारून स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे डॉ.पंकज शिनगारे यांनी या केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. श्री.व्यंकट लामजाने यांनी देखील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती दिली.दिव्यांग व्यक्ती श्री.गायकवाड यांनी कविता सादर केली.
दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी श्री.काशिनाथ शिंदे यांनी दिव्यांगांवर होणाऱ्या अन्याय थांबवावे, ग्रामपंचायतला देण्यात येणारा ५ टक्के निधीचा वापर दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी व्हावा.घरकुल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा.दिव्यांगांचे प्रमाणपत्र देताना पारदर्शकता असावी. बँकांनी रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. दिव्यांगाचे आयुष्यमान कार्ड काढण्यात यावे, एसटी बसेसमध्ये दिव्यांगासाठी राखीव सीटवर दिव्यांग व्यक्तीला बसण्याची व्यवस्था करावी.वैश्विक दिव्यांग ओळखपत्र तयार करून द्यावे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रारंभी लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली आव्हाड यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी मानले. या कार्यशाळेला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे कर्मचारी, दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps