बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला - ॲड भोसले
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला - ॲड भोसले
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - शिवसेना (ठाकरे) कडे नगर परिषद असताना शहराची जी बकाल अवस्था केली, त्याचा संताप आज धाराशिवकरांच्या मनात खदखदतो आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना थेट तिसऱ्या नंबरवर पाठवण्याचा ठाम निर्णय मतदारांनी घेतला आहे. त्यांचे चार-पाच नगरसेवकही निवडून येणार नाहीत, याची खात्री झाल्याने उर्वरित तीन जागांपैकी किमान एक तरी मिळावी म्हणून आमच्या नेत्यांवर बेछूट व खोटे आरोप सुरू असल्याची टीकास्त्र भाजपाचे जिल्हाप्रवक्ते ऍड नितीन भोसले यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोडले.
पुढे बोलताना ॲड भोसले म्हणाले की, ज्यांच्या राजकारणाचा पाया खोटेपणावर उभा आहे, त्यांच्याकडून असले बेताल आरोप अपेक्षितच आहेत. आ राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेऊन स्वतःची टीआरपी वाढवण्याचा जुना धंदा आता सर्वांना ओळखीचा झाला आहे. अशा खोट्या आणि बिनबुडाच्या वक्तव्यांना आम्ही अजिबात भीक घालत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या २१ तारखेला धाराशिवची जनता त्यांच्या या खोटारड्या राजकारणाला त्याची जागा दाखवून देणार, विकासाला साथ देणार मात्र अपप्रचाराला नाही, असा खोचक टोलाही ॲड भोसले यांनी लगावला आहे.