माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
- Get link
- X
- Other Apps
माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री, मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ स्मिता शहापूरकर व दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांनी तीव्र शोक भावना व्यक्त करीत आपल्या लाडक्या संवेदनशील नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कौटुंबिक स्नेही तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राजकारणातील सभ्यता, विनयशीलता आणि तत्त्वनिष्ठ आचारधर्माचा एक आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदांवर त्यांनी कार्य केले व संवैधानिक प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
चाकूरकर साहेब आमच्यासाठी केवळ ज्येष्ठ नेता नव्हते,तर ते सतत मार्गदर्शन करणारे, आपुलकीने आधार देणारे व कायम आशीर्वाद पाठीशी ठेवणारे वडीलधारी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या शांत, संयमी आणि दूरदृष्टीपूर्ण सल्ल्यामुळे अनेक प्रसंगात योग्य दिशा मिळत असे. त्यांचा तो स्नेह, ती माया आणि योग्य वेळी दिलेला हृदयस्पर्शी आधार सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या जाण्याने सुसंस्कृत, प्रामाणिक आणि लोकांच्या भावना ओळखणारा एक मोठा आधारस्तंभ आपण गमावला आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि चाकूरकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
- आ.राणाजगजितसिंह पाटील
.................
शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो, परंतु व्यक्तिगत नात्यातील आपुलकी, स्नेह आणि परस्परांचा मान हे बंध नेहमीच अबाधित राहिले. मतभेदांच्या पलीकडेही ते माणुसकी जपणारे, सर्वांना जोडून ठेवणारे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे नेते होते.
त्यांच्या मार्गदर्शनाची, मोठेपणाची आणि सौजन्याची कमतरता सदैव जाणवेल.
चाकूरकर कुटुंबीयांना आणि त्यांच्या अनुयायांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
- डॉ. पद्मसिंह पाटील
............
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने निर्माण झाली मोठी पोकळी
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजसिंह पाटील चाकूरकर यांच्या निधनाने राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक सभ्य, संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले आहे. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी लोक संपर्क, प्रशासकीय कौशल्य आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सौम्य स्वभाव, संवादकुशलता आणि लोकांसाठी सतत उपलब्ध राहण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी होती. धाराशिव व लातूर परिसराशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करून शोक संवेदना व्यक्त केल्या.
......
पक्षाने, देशाने सोपवलेल्या सर्व जबाबदार्या सक्षमपणे पार पाडल्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, निष्कलंक, शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्ती देशाच्या लोकसभा अध्यक्षपदी, कॅबिनेट मंत्रीपदावर, विशेषतः गृहमंत्रीपदावर असणे ही देशाची प्रतिष्ठा उंचावणारी बाब आहे. दिवंगत डॉ. शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री या नात्याने हे अनेकदा सिद्ध केले. आयडिया ऑफ इंडियाशी वैचारिक बांधिलकी जपत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोपवलेल्या सर्व जबाबदार्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या. मृदु पण स्पष्ट भाषा, उत्तम, दर्जेदार इंग्रजी, अतिशय संयमी आणि मुद्देसूद, अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची खासियत होती. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे, श्रोत्यांसाठी राजकारण, सामाजिक घडामोडींचा अभ्यास, संविधानाने दिलेल्या अधिकारांचे स्पष्ट आकलन असे. आपला आब राखून, उच्च प्रतीचे एटिकेट्स आणि प्रोटोकॉल्सचे आदर्श पालन करण्याचे उदाहरण आपल्यासमोर ठेवणारी माणसे आजकाल दुर्मिळ होत जात आहेत.- डॉ. स्मिता शहापूरकर, काँग्रेसच्या प्रदेश सचिव.
.........,
आदरणीय चाकूरकर साहेब हे २०१३ धाराशिव जिल्ह्यात दौऱ्यावर विविध कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याशी हितगुज साधून पहिली मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले. तसेच जिल्ह्यातील इतर कार्यक्रम त्यांच्या सोबत उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्याचे संधी मला मिळाली. विशेष म्हणजे त्यांना सुरक्षा असताना देखील त्यांनी मला सोबत बसवले. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील पत्रकारास कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार न बाळगता सेवा करण्याची संधी जवळून दिली. हे मी आयुष्यभर माझ्या हृदयात लेखणीरूपाने जतन करून ठेवीन. त्यांच्या जाण्याने पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मोठी पोकळी केव्हाही न भरून येणारे हानी झाली आहे.
- मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे
जिल्हा प्रतिनिधी, दैनिक यशवंत
- Get link
- X
- Other Apps