तीस हजारांची लाच घेणारे हावितरणचे तीन लाचखोर गजाआड
- Get link
- X
- Other Apps
तीस हजारांची लाच घेणारे हावितरणचे तीन लाचखोर गजाआड
धाराशिव दि. १० (प्रतिनिधी) - हातात अधिकार आल्यानंतर मनमानी करणाऱ्यांचा डामडौल व थाटमाट वाढतो. असाच प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यालयात घडला आहे. तीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पदस्थापना करून देण्यासाठी तिघाकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या त्या तीन लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्या सापळ्यात ते तीन लाचखोर अलगद अडकल्याने
त्यांना दि.१० डिसेंबर रोजी गजाआड केले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या कार्य पद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी पदस्थापना हवी होती. मात्र ती मिळत नसल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी अशी मागणी केली. मात्र हातात आलेला अधिकार आणि लाचेचे डोक्यावर सवार झालेले भूत याने जखडलेल्या त्या तीन अधिकाऱ्यांनी तक्रारदार व त्याच्या मित्राकडून ३० हजार रुपयांची लाच घेतली. मात्र ३० हजार रुपयांवर त्यांचे समाधान झाले नसल्यामुळे त्यांनी पुन्हा २० हजार रुपये लाच देण्याची मागणी केली. परंतू तक्रारदार व त्याच्या मित्रांना आणखी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधला. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्यामध्ये ते लाचखोर सापडले. त्यामुळे आरोपी उदय दत्तात्रय बारकुल (वय ४१, निम्नस्तर लिपिक, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, धाराशिव), भारत व्यंकटराव मेथेवाड (वय ५०, उपव्यवस्थापक मानव संसाधन, विभागीय महावितरण कार्यालय, धाराशिव) आणि शिवाजी सिद्राम दूधभाते (वय ४०, उच्चस्तर लिपिक, अधीक्षक अभियंता कार्यालय, धाराशिव) हे तिघे आहेत. पदस्थापनेच्या आमिषाने तक्रारदाराकडून अनुक्रमे २० हजार रुपये व त्याच्या मित्राकडून १० हजार रुपये घेतल्याचे, तरीही पदस्थापना न करता मेथेवाड यांनी पुन्हा २० हजार रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. या संदर्भात तक्रारदाराने २६ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रार पडताळणी दरम्यान २६ व २९ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष सर्व व्यवहारांचे पुष्टीकरण झाले. आरोपी बारकुल यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेले २० हजार रुपये आणि मित्राकडून घेतलेले १० हजार रुपये यातील १० हजार रुपये मेथेवाड यांना आणि १० हजार रुपये दूधभाते यांना दिल्याचेही निष्पन्न झाले. मेथेवाड यांनी यापैकी ५ हजार रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचेही पडताळले गेले. तिन्ही आरोपींनी संगनमताने लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना गजाआड करण्यात आले. तसेच
सापळा टाकून तीन्ही आरोपींची अंगझडती घेण्यात आली. त्या झडतीमध्ये बारकुल यांच्याकडून मोबाईल (Vivo), १ हजार रुपये रोख, पेन ड्राईव्ह व ओळखपत्रे तर मेथेवाड यांच्या ताब्यातून OnePlus मोबाईल, साडेचार हजार रुपये रोख, ATM व ओळखपत्रे तसेच दूधभाते यांच्या ताब्यातून OnePlus मोबाईल, टायटन घड्याळ, १ हजार रुपये रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तिघांचे मोबाईल पुढील तांत्रिक तपासासाठी जप्त केले असून घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. सक्षम अधिकारी म्हणून महावितरणचे महाव्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे हे करीत असून संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे व पो. उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. या पथकात पोनि नरवटे, पोहे. जाधव, पोअ. तावस्कर, पोअ. डोके आणि पोअ. हजारे यांचा समावेश होता.
- Get link
- X
- Other Apps