करियर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
करियर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अणदूर दि.१३ (प्रतिनिधी) - युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व आदर्श राज्यकर्त्या राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आवर नेस्ट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अणदूर पंचकृशितील विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राष्ट्रभक्तीपर गीत घेऊन मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजकुमार गाढवे यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी राज्य मंत्री मधुकरराव चव्हाण तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे आदी उपस्थित होते. दरम्यान आयोजकांकडून मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधन करताना नोकरी व्यवसायासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविदयालय, सोलापूरचे प्रा.डॉ.प्रदीप जगताप यांनी तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य भरतीपासून ते एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी नेमका अभ्यास कसा करायचा ? असे सांगितले. नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेशवर गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व परिश्रम या चतू:र्सूत्रीचा मूलमंत्र दिला. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना विविध प्रश्नांचा घेराव टाकत दिलखुलास उत्तराने स्वतःतील न्यूनगंड व अभ्यासातील समस्यांचे निरसन करून घेतले. जिल्ह्यामध्ये अणदूर हे उच्च शिक्षणाचे केंद्रच आहे. यावेळी धनराज मुळे, दिपक घोडके, शिवाजी कांबळे, देविदास घोडके, जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय, अणदूर, श्री श्री रविशंकर विद्यामंदिर अणदूर, बालाघाट कॉलेज नळदुर्गसह अणदूर, धनगरवाडी, जळकोट, इटकळ, शहापूर, इश्र्वरवाडी व सराटी आदी पंचकृशितील जवळपास ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
गेल्या ८ वर्षापासून संस्थेच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम उपक्रम राबविले गेले आहेत. तर पुढेही चालूच असतील असे प्रशांत पोतदार व संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले. प्रवीण प्रकाश घोडके यांनी पुढील काही दिवसांतच हुतात्मा स्मारक येथे अणदूर पंचकृशितील होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भैरवनाथ कानडे यांनी तर प्रियंका प्रवीण घोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आकाश घोडके, अंकुर घोडके, राहुल घोडके, महेश घोडके, अंकुश चीनकारे,उमेश लांडगे, रोहित दुधाळकर, महादेव घोडके, बालाजी लांडगे, रिजवान शेख आदींनी प्रयत्न केले.