आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर एक बनविणार - ना. सावंत
आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर एक बनविणार - ना. सावंत
आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित
उस्मानाबाद दि.१७ (प्रतिनिधी) - सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करीत आहेत. तर अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी आरोग्य कार्ड बनविले जाईल. त्यामुळे जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात नंबर एकचे राज्य बनविणार असल्याचा ठाम विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
पुणे येथील बालगंधर्व येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य फिल्म फेस्टिवल २०२२-२३ चे आयोजन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, डॉ. केतन खाडे, डॉ. वैशाली बिऱ्हाडे, डॉ. तृप्ती शिंदे, स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की, गेल्या ६ महिन्यात आमच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या माता आणि भगिनीसाठी राबविलेल्या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. तर जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेला ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच राज्यातील सर्व सदृढ व निरोगी बनविण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला असून तो आम्ही पूर्ण करणारच असे सांगितले. तर
आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी आरोग्य आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत असे सांगितले. तर डॉ.मोहन आगाशे म्हणाले की, या महाआरोग्य फिल्म फेस्टिवल निमित्त अनेक लपलेले दिग्दर्शक पुढे येतील. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य व शिक्षणाश यासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो व आरोग्य विभागाने ते दाखवून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यभरातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसाद मिळाला असून १५५ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडीत होत्या. त्याचे ८ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले असून ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट अशा १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास २० हजार रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार रुपये व तृतीय क्रमांकास १० हजार रुपये तर चौथा क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी दोन अडीच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तर उर्वरित सहभागींना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी विजेत्यांना डॉ. सावंत यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी तर सूत्रसंचालन रजनी वाघ यांनी व आभार डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी मानले.
......................................................................
लघुपट, माहितीपट गटात, रोहन शाह (प्रथम, साखरेपेक्षा गोड), अनुपम बर्वे (द्वितीय, गोष्ट अर्जुनाची), प्रवीण अजिनाथ खाडे (तृतीय, ताजमहाल), आर के मोशन पिक्चर (चतुर्थ, फॉरएवर), रायबा अंजली (चतुर्थ, बबाते), टीव्ही स्पॉट गटात, राहुल सोनावणे (प्रथम, अडाणी), शैलेंद्र गायकवाड (द्वितीय, टीबी हारेगा देश जितेगा), लोकेश तामगिरे (तृतीय, साल्ट रिडकशन शोले), निखील राहुल भडकुंबे (चतुर्थ, शेतकरी), सय्यद बबलू (चतुर्थ, एंड ऑफ लाईफ).