कार्यतत्परता दाखविणाऱ्या महिला डॉक्टरचे आरोग्यमंत्री सावंत यांनी केले कौतुक
कार्यतत्परता दाखविणाऱ्या महिला डॉक्टरचे आरोग्यमंत्री सावंत यांनी केले कौतुक
उस्मानाबाद दि.३१ (प्रतिनिधी) - देवदूत आहेत की नाहीत ? हे अद्यापपर्यंत कोणीही पाहिलेले नाही. मात्र मानवाच्या विशेषतः प्राणांतिक क्षणी मागचा पुढचा कुठलाही विचार व क्षणांचाही विलंब न करता आपदग्रस्त रुग्णाच्या मदतीला धावत जाऊन त्याचे प्राण वाचविणारे डॉक्टर हे खरोखरच देवदूतच असतात. असाच प्रकार एका तरुणाने विषारी औषध प्राशन केले होते. त्या रुग्णास वैद्यकीय उपचाराची अत्यंत आवश्यकता होती. त्यावेळी एका गरोदर डॉक्टरांनी समय सुचकता दाखवित. त्या रुग्णास रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले. याची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी त्या महिला डॉक्टरचे फोनद्वारे अभिनंदन करून कौतुकाची थाप पाठीवर टाकली आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून ते अधिक उत्साहाने काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील म्हाळसा कोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार या सेवेत आहेत. मांजरगाव येथील एका २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते. या रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे होते. म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका पवार यांनी या रुग्णाला तपासले. मात्र रुग्णाचा वाढत चाललेला त्रास पाहून त्यांनी त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात हलवणे महत्त्वाचे आहे हे ओळखले. दरम्यान म्हाळसा कोरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याचे त्यांना कळाले. दुसरी व्यवस्था करण्यामध्ये वेळ जाईल हे ओळखून स्वतः डॉक्टर प्रियंका पवार यांनी रुग्णवाहिका चालविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्या स्वतः गरोदर असूनही कसलाही विचार न करता त्यांनी तातडीने रुग्णाला निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचवून पुढील उपचार सुरू केले. डॉ पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगाधावानामुळे तरुणांचे प्राण वाचले व त्याला नवीन जन्म मिळाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ पवार यांचे आभार मानत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या अशा कार्यतत्पर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची मान उंचावत आहे.