मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल आकांक्षीत जिल्ह्यात चांगले काम करु शकलो जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल
आकांक्षीत जिल्ह्यात चांगले काम करु शकलो - ओंबासे
मल्लिकार्जुन सोनवणे
उस्मानाबाद दि.२४ - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांमध्ये जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्यामुळे आकांक्षीत असलेला उस्मानाबाद जिल्हा राज्यामध्ये प्रथम आला आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम २०२२-२३ या अंतर्गत ६५० रोजगार निर्मिती प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याऐवजी जिल्ह्याने ६५१ प्रकरणे मंजूर केली आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या सालामध्ये ६५१ जणांना उत्पादन सेवा व उद्योग सेवा या अंतर्गत प्रशिक्षण दिले असून त्या उद्योगासाठी २० कोटी रुपये कर्ज निधी उपलब्ध करून दिला आहे. तर यासाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. तर मंजूर झालेल्या कर्जापैकी ३ कोटी ८५ लाख रुपये देण्यात आलेला आहेत. दरम्यान, अकोला जिल्ह्याने ७५० उद्दिष्ट पैकी ७३० पूर्ण केले आहे. तर अमरावती जिल्ह्याने ८०० उद्दिष्टापैकी ७३२ पूर्ण केले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यासाठी ६०० उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ५९१ पूर्ण केले असून या ३ जिल्ह्यांपैकी दुसरा व तिसरा क्रमांक कोणता जिल्हा पटकावणार मार्च अखेरीस स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे वरील ३ जिल्हे हे विदर्भातील आहेत हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.
............................................................
आकांक्षीत जिल्ह्यामध्ये चांगले काम करू शकलो - ओंबासे
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी बोर्ड या विभागाच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अतिशय चांगले काम केले आहे. त्याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह इतर बँकांचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, झोनल अधिकारी यांच्यासोबत बैठका घेतल्या तर अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास बँकांनी सहकार्य करून चांगला प्रतिसाद दिला असल्याचे नमूद केले. तर जिल्हा उद्योग केंद्र व खादी बोर्डाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व त्यांच्या सर्व टीमचे मी विशेष अभिनंदन केले. तसेच लाभार्थ्यांनी देखील लवकरात लवकर आपला उद्योग सुरू करावा असे आवाहन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा जिल्हा आकांक्षीत जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात या पद्धतीचे चांगले काम करू शकलो असल्याचे समाधान देखील त्यांनी व्यक्त केले.
...............................................................
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार
जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांच्या हस्ते राज्यात जिल्हा अव्वल आल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. व्यवस्थापक एन.पी. जावळीकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताटे, व्यवस्थापक एम.डी. सुर्यवंशी, उद्योग निरीक्षक दिलीप बिराजदार व प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शाबासकीची थाप देत त्यांचे विशेष कौतुक केले.