एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी
शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करणार
संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.११ एप्रिल रोजी दिली.

जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री  शिंदे यांनी वाडी बामणी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आ राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपल्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव आहे. त्यामुळे या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आपण शेतात आलो असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य शासन सदैव शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची अधिक भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच सततच्या पावसाचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अन्नदाता बळीराजावर आलेले अरिष्ट दूर होवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी अयोध्येत श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच २० मोठी जनावरे दगावल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. तसेच शिंदे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

मोर्डा, वाडी बामणी येथे शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सीताबाई उत्तम सुरवसे व उत्तम सुरवसे या शेतकरी दाम्पत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. २ एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवसे दांपत्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुरवसे दाम्पत्याला कोणकोणत्या बँकांची किती कर्जे आहेत, याची विचारणा केली. सुरवसे यांच्या भुईसपाट झालेल्या द्राक्ष बागेत शिंदे यांनी आतमध्ये जावून नुकसानीची पाहणी केली.

धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील बाबासाहेब उंबरदंड व साधना उंबरदंड या शेतकरी दाम्पत्याच्या कलिंगड व ड्रॅगन फ्रुट बागेच्या नुकसानीची पाहणी केली.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !