जिल्ह्यातील ५ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा डंका ३ ठिकाणी भाजप- शिवसेना महायुतीचा झेंडा महायुतीची अवस्था गड आला पण सिंह गेल्यासारखी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये झाली अटीतटीची लढाई उमेदवार पळवा पळवीचे आखाडे पेटणार !
जिल्ह्यातील ५ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा डंका
३ ठिकाणी भाजप- शिवसेना महायुतीचा झेंडा
महायुतीची अवस्था गड आला पण सिंह गेल्यासारखी
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये झाली अटीतटीची लढाई
उमेदवार पळवा पळवीचे आखाडे पेटणार !
धाराशिव जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडून आज निकाल घोषित झाला. आठ कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकीमध्ये पाच कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने तर तीन बाजार समितीवर महायुतीने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ सरळ दुरंगी लढत झाली. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर व धाराशिव या दोन ठिकाणी दणदणीत विजय संपादन केला आहे. मात्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मतदार संघातील परंडा, भूम व वाशी या तीन बाजार समित्यापैकी परंडा व वाशी या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना निवडून दिलेले असून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सत्ता आपलीच आली अशा ब्रह्मात आहेत. मात्र आता खरा खेळ सुरू झाला असून राजकीय मंडळी या बाजार समितीवर आपलीच सत्ता रहावी यासाठी बहुमताची जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी कोणत्या उमेदवाराला आपल्या जाळ्यात सहजासहजी वाढता येईल याची चाचणी सुरू केली आहे. तसेच जे उमेदवार सहजासहजी आपल्या गळाला लागणार नाहीत त्यांची थेट उचल बांगडी करून त्यांना सहलीवर पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मनी, मसल व पावर याचा पुरेपूर वापर कसा करायचा ? याची वेगळीच तालीम सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या मंडळी समोर आपले निवडून आलेले सदस्य या बाजार समितीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड प्रक्रिया पार पाडेपर्यंत त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाला लागले आहेत.
तुळजापूर कृषी बाजार समितीवर १४ भाजप तर ४ ज महाविकास आघाडी
तुळजापूर कृषी बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत १८ तारखेची भाजपने १४ जागा जिंकून परत एकदा बाजार समितीवर आपला झेंडा फडकला.
शनिवार दि.२९ रोजी तुळजाभवानी अभियांत्रिकी स्पोर्ट्स क्लब हॉल मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एम. आर.अंबीलपूरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरुवात झाली.सुरुवातीस हमाल मतदारसंघा तील निकाल भाजपच्या बाजूने गेला तर ग्रामपंचायत मतदार संघातील निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेले सोसायटी मतदारसंघात क्रॉस वोटिंग झाल्यामुळे वेळ लागला यामध्ये अखेर भाजपने बाजी मारली.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभापती सचिन पाटील, विजय गंगणे यांच्या योग्य नियोजनाने तुळजापूर कृषी बाजार समिती भाजपने १८ पैकी १४ जागा जिंकून समितीवर वर्चस्व कायम राखले. त्यापैकी सोसायटीत ११ पैकी ११ तर व्यापारी २ पैकी २ तर हमाल मतदारसंघात १ उमेदवार निवडून आला. ग्रामपंचायत मतदार संघात सगळे ४ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकून भाजपला एक प्रकारचा धक्का दिला आहे.यावरून कळते की तालुक्यातील ग्रामपंचायती वर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. निकाल लागल्यावर भाजप व शिंदेसेना कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्लोष केला.
धाराशिव बाजार समितीवर महायुतीची विजय
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने १८ पैकी १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. विरोधी गटातील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीस केवळ एकच जागा मिळाल्याने मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले आहे. निवडणूक निकालाची घोषणा होताच विजयी पॅनलच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढत जेसीबीने गुलाल उधळून जल्लोष केला.
उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप-सेना युतीमध्ये दुरंगी लढत रंगली होती. दोन्ही पॅनलच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही गटांकडून तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. बाजार समितीच्या १८ जागेसाठी दि.२८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. एकूण २७६६ मतदारापैकी २६४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचे शेकडा प्रमाण ९५.४१ टक्के होते. मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने या निवडणुकीच्या निकालाकडेच लक्ष वेधले होते. शहरातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात दि.२९ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ टेबलवर मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवघ्या अडीच तासात मतमोजणी प्रक्रीया पूर्ण करून निकाल घोषीत केला. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप- सेना (शिंदे गट) पुरस्कृत पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मात्र केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक निकालाची घोषणा होताच विजयी पॅनलच्या समर्थकांनी मिरवणूक काढून जेसीबीने गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण गटात राजेंद्र पाटील (५६४ मते), संजय वाघ (५५७), निहाल काझी (५१२), प्रदीप वीर (५५७), दत्तात्रय देशमुख (५२०), अमरसिंह पडवळ (५७४), संतोष पवार (५६४), महिला गटातून मनिषा पाटील (५८०), स्वाती कोळगे (५८०), ओबीसी प्रवर्गातून गोविंद लगडे (५८७), हिरामण चव्हाण (५९७), ग्रापं सर्वसाधारण मतदारसंघ सर्वसाधारण गटात अनिल भुतेकर (५३१), सुधीर भोसले (५०९), अनु.जा. प्रवर्गातून सुभाष पाटोळे (५३५), मुराद पठाण (५२६), हमाल-तोलाईदार मतदारसंघात सौदागर चव्हाण व व्यापारी मतदारसंघात विपीन काकडे १४२ हे भाजप - सेना युतीचे १७ उमेदवार तर व्यापारी मतदारसंघातून महाविकास आघाडी विजयी झाले आहेत.
भूम बाजार समितीवर महायुतीचा झेंडा
भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व सिध्द केले.महाविकास आघाडीला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला असून केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक निकालाची घोषणा होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आंनदोत्सव साजरा केला.
भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाई महायुतीविरूध्द शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये दुरंगी लढत रंगली होती. या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले तर शनिवारी (दि.२९) मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, भाजपचे माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील अलमप्रभू शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. महाविकास आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडणुकीच्या प्रचारामध्ये अटीतटीची होईल असे वाटणारी निवडणूक निकालातून मात्र एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. पालकमंत्री डॉ.सावंत यांनी भाजप आणि रिपाइंला सोबत घेऊन ही निवडणूक लढविली. राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल मोटे यांनी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसला सोबत घेऊन वज्रमूठ बांधली मात्र मतपेटीपर्यंत ही वज्रमूठ टिकू शकली नाही. या निवडणुकीत सर्वाधिक मताने विजय विशाल ढगे यांनी मिळविला. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीराम खंडागळे यांच्यापेक्षा ८४ मते जास्तीचे घेतली. दिगांबर सुपनवर (११) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी गोरोबा कुंभार (१०) यांना एका मताने पराभूत केले. सर्वसाधारण मतदार संघातून शिवसेनेचे विशाल अंधारे (३०४) , वसंत कांबळे (२९५), दत्तात्रय गायकवाड (२९६), जयसिंग गोपने (२९५), अजित पवार (२९८), चंद्रकांत बोराडे (२८०) , निलेश शेळवणे (२७६), ओबीसी मतदार संघातून समाधान सातव (३२९) , विमुक्त जाती मतदार संघातून अप्पासाहेब हाके (३१४) , ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून प्रविण देशमुख (३०५), अंगद मुरूमकर (२६८),अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बापू भालेराव (३१५), आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून विशाल ढगे (३२२), व्यापारी मतदार संघातून रोहन जाधव (४६), महिला राखीव मतदार संघातून मालन अनभुले (३२६), दमयंती जालन (३१६), हमाल, तोलारी मतदारसंघातून दिगंबर रूपनवर (११) हे उमेवार विजयी झाले. महायुतीचे व्यापारी मतदार संघातून रमण वऱ्हाडे हे पराभूत झाले. त्याना ३२ मते मिळाली. महाविकास आघाडीकडून व्यापारी व आडते मतदार संघातून वसंत लवटे (४१) हे विजयी झाले. महाविकास आघाडीकडून सर्व साधारण मतदार संघातून राजेंद्र गपाट (२५३) , प्रभाकर डोंबाळे (२५०), सुनिल देशमुख (२५८), संदीपान पवार (२३५), महादेव वारे (२४६) , उद्धव सस्ते (२४३), समाधान हाडुळे (२४७), ओबीसी मतदार संघातून विश्वनाथ शिर्के (२८०) , विमुक्त जाती मतदारसंघातून भाऊसाहेब मारकड (२९५), ग्रापं सर्वसाधारण मतदार संघातून प्रदीप शेळके (२४९) , सयाजी हुंबे (२३१) ,अनुसूचित जाती मतदार संघातून रवींद्र वाघमारे (२४२ , आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून श्रीराम खंडागळे (२३८) , व्यापारी गटातून राहुल हुरकुडे (२५) , विद्या नागरगोजे (२६८) , शालन शेळके (२८१) , हमाल, तोलारी मतदारसंघातून गोरोबा कुंभार यांना १० मते मिळाली. निकालाची घोषणा होताच महायुतीच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी नपचे माजी गटनेते संजय गाढवे, जिपचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर , डीसीसी बँकेचे माजी संचालक शिवाजी भोईटे , भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर , जि.प. माजी सभापती दत्तात्रय मोहीते , माजी पंस उपसभापती रामकिसन गव्हाणे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ , युवासेना तालुका प्रमुख निलेश चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, युवराज तांबे, सुभाष देवकते, सीताराम वणवे, माजी पंस सदस्य मधुकर अर्जुन , श्रीहरी दवंडे , उद्योजक सुरज गाढवे , बाळासाहेब सुर्वे , दत्तात्रय नलवडे , युवराज हुंबे , सागर खराडे , बाळासाहेब लिमकर , संतोष सुपेकर , प्रभाकर शेंडगे ,शाम वारे , भरत सुरवसे , दत्ता काळे , प्रमोद शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी कृषी उत्पन्न समितीवर महाविकास आघाडी
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ पैकी १२ जागा जिंकुन बाजार समितीची एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेना -भाजप युतीला माञ ६ जागेवरच समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून माजी आ. राहुल मोटे यांनी बाजार समितीवर वर्चस्व सिध्द केले तर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक निकालाची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष केला.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस उध्दव ठाकरे सेना यांच्या महाविकास आघाडीविरूध्द शिवसेना शिंदे गट व भाजप युतीमध्ये लढत रंगली होती. बाजार समितीच्या १८ जागेसाठी शुक्रवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले.या अटीतटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सोसायटी मतदार संघातील ११ व व्यापारी मतदार संघातील एका अशा १२ जागेवर विजय मिळवून बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली. महायुतीला ग्रामपंचायत मतदार संघातील ४, व्यापारी मतदार संघातील एक व हमाल व तोलार मतदार संघातील १ अशा ६ जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे.
आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये व्यापारी व आडते मतदार संघातील विकास मोळवणे (१२८ मते), सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातुन सुभाष कुरुंद (१८१), तात्यासाहेब गायकवाड (१६९), रणजीत गायकवाड (१७४), महादेव ढेपे (१७५), महादेव मोटे (१७४), रविकर मोराळे (१६७), शशिकांत मोरे (१७७), महिला राखीव गटातून वैशाली शिंदे (१९७), पानकवर सुरवसे (१८०), भटक्या जमाती गटातून पांडुरंग घुले (१९३), ईतर मागासवर्ग गटातून मधुकर पंडीत (१८७) हे विजयी झाले तर महायुतीमधील विजयी उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून नितिन रणदिवे (२१५), सुनिल उंदरे (२०९), अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातून उध्दव साळवी (२१५), आर्थिक दुर्बल घटक गटातून विकास तळेकर (२१०), व्यापारी व आडते मतदार संघातून प्रकाश शिंदे (१३८), हमाल व तोलार मतदार संघातून अमोल कवडे (३८) हे विजयी झाले आहेत.