शेत रस्त्यावरुन शेताकडे जाणाऱ्या वृद्ध दांपत्यास बेदम मारहाण वृद्ध महिला शेतकऱ्याची रस्ता देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शेत रस्त्यावरुन शेताकडे जाणाऱ्या वृद्ध दांपत्यास बेदम मारहाण
वृद्ध महिला शेतकऱ्याची रस्ता देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
उस्मानाबाद दि.४ (प्रतिनिधी) - वडिलोपार्जित शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध दांपत्यास एकाने मारहाण केले आहे. या रस्त्यावरून तुम्ही गेलात तर तुम्हाला जिवंत मारले जाईल अशी धमकी देत बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. तसेच सर्व्हे नंबरवरील रस्ता मोकळा करुन देण्यात यावा अशी मागणी वृद्ध शेतकरी मोहरबाई विनायक गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे दि.४ एप्रिल रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी येथील मोहरबाई विनायक गायकवाड यांची ताकविकी शिवारामध्ये गट क्रमांक २८२ मध्ये ६ एकर ८ गुंठे शेतजमीन आहे. मात्र ती जमीन आम्हाला दे असे म्हणत दिलीप विठोबा गायकवाड, माणिक रामा गायकवाड व त्यांचा मुलगा दीपक रामा गायकवाड हे सर्व्हे नंबरच्या बांधावरुन जायचे नाही, तो बांध पूर्णपणे आमचा आहे. तुम्ही या बांधावर अजिबात फिरकायचे नाही. जर बांधावर किंवा शेतामध्ये पाय ठेवला तर तुम्हाला जिवंत मारले जाईल अशी वारंवार धमकी देत आहेत. तर दि.३० मार्च रोजी विनायक रामा गायकवाड व त्यांच्या पत्नी मोहरबाई गायकवाड या त्यांच्या शेतामध्ये जात असताना त्या वृद्ध दाम्पत्यांना दिलीप विठोबा गायकवाड, दिपक माणिक गायकवाड व माणिक रामा गायकवाड या तिघांनी बेदम मारहाण करीत नांगरलेल्या शेतामध्ये ढकलून दिले. शेताला जाण्यासाठी वडिलोपार्जित सामायिक रस्ता असताना देखील या रस्त्यावरून आम्ही जाऊ नये यासाठी दिलीप व दीपक यांनी सर्व्हे नंबरचा बांध पूर्णपणे जेसीबीच्या साह्याने नांगरून उध्वस्त केला आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई करून आम्हाला हा शेत रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी मोहरबाई गायकवाड यांनी केली आहे.
,................................................................
दि.३० मार्च रोजी मोहरबाई विनायक गायकवाड व विनायक रामा गायकवाड या वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत विनायक गायकवाड यांच्या कंबरेला जबर मार लागल्याने ते सध्या तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात मोहरबाई गायकवाड यांच्या तक्रारीवरून दिलीप विठोबा गायकवाड, दीपक माणिक गायकवाड व माणिक रामा गायकवाड यांच्या विरुद्ध गु.र.नं. १२६/२०२३ भादवि कलम - ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.