शिराढोणकरांना मिळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील शिराढोणचे नितीन पाटील यांनी स्वखर्चातून २२ फुट उंचीचा व ५ लाख ५१ हजार रुपये खर्च करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शिराढोणकरांना डॉ आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दि.१३ एप्रिल रोजी धम्मदान केला आहे.
पालकमंत्री प्रा डॉ सावंत हे बळीराजासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील आर्थिक पाठबळ देण्याचा दानशूरपणा जिल्हावासियांनी अनुभवलेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन पाटील यांनी स्वखर्चातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते व भन्ते सुमेधजी नागसेन यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद वाघमारे, विधानसभा संघटक अमोल पाटील, तालुकाप्रमुख लक्ष्मण हुलजुते, कळंबचे माजी नगराध्यक्ष सागर मुंडे, संजय मुंदडा, अमर वाघमारे, सुधीर भवर, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, ऍड. मंदार मुळीक, सुहास बारकुल, दिनेश पवार आदींसह शिवसैनिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.