आ. पडळकर यांनी आपले वय व अनुभव पाहून बोलावेमंत्री सावंत यांचा पडळकरांना मार्मिक सल्ला
आ. पडळकर यांनी आपले वय व अनुभव पाहून बोलावे
मंत्री सावंत यांचा पडळकरांना मार्मिक सल्ला
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबाबाबत सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने पडळकर पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे पडळकरांनी आपले वय व अनुभव पाहून वक्तव्य करावे. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते असून ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्याबद्दल आदरानेच बोलले पाहिजे असा मार्मिक सल्ला शिंदे गटाचे मंत्री तानाजीराव सावंत यांनी आ. पडळकर यांना दि.५ जून दिला आहे.
धाराशिव येथे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की,
धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेचीच असून ती जागा शिवसेना लढवणारच असा खळबळजनक दावा मंत्री सावंत यांनी केला आहे. तसेच परवा भाजपाचे आ राणाजगजितसिंह पाटील यांनी आगामी होणाऱ्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा भाजपा लढणार असल्याचा दावा केला होता. शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टीने एकाच जागेवर आपला हक्क सांगितल्यामुळे भाजपा व शिंदे गटामधील सुप्त व अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. २०१९ च्या लोकसभेच्या शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. विजय व पराजय झालेल्या जागा या शिवसेनेच्या असून त्या जाग्यावर आम्ही निवडणुका लढवणार असल्याचे सावंत यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात धाराशिव ची जागा नेमकी कोण लढविणार ? यावर तर्कवितर्कांना उधान आले आहे.