जाहीरातबाज सरकारची शेतकऱ्यांबरोबर पुन्हा लबाडी आमदार कैलास पाटील यांची सरकारवर जहरी टीका
जाहीरातबाज सरकारची शेतकऱ्यांबरोबर पुन्हा लबाडी
आमदार कैलास पाटील यांची सरकारवर जहरी टीका
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - जवळपास १० महिन्यांनी सततच्या पावसाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. निकषाच्या बाहेर जाऊन १३ हजार ६०० रुपयाने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने पुन्हा ८ हजार ५०० हजार रुपयांचा शब्द दिला. तर प्रत्यक्षात देताना मात्र फक्त ४ ते ५ हजार रुपयांवरच बोळवण केली आहे. ही सरकारची लबाडी असून शेतकऱ्यांसोबत अशी लबाडी करणाऱ्या सरकारचे सत्ताधारी लोक कधीपर्यंत तुणतुणे वाजविणार आहेत असा जहरी सवाल आ कैलास पाटील यांनी केला आहे.
गतीमान व वेगवान अशा कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ही गतीमानता व प्रामाणिकपणा दाखविला नाही. विम्याबाबत कंपनी धार्जिनी भूमिका घ्यायची. सततच्या पावसाच्या अनुदानाला १० महिने विलंब लावायचा, कांदा अनुदानात जाचक अटी लावुन शेतकरी पात्र होणार नाही याची काळजी घ्यायची, खरेदी केंद्र वेळेवर सूरु न करण्याने शेतकऱ्यांचे ठरवून नुकसान करायचे व व्यापार्यांसाठी पुरक वागायचे अशा कितीतरी गोष्टीबाबत सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे सर्वांसमोर आहे. तर सततच्या पावसाचे अनुदान देण्यासाठी राज्य सरकारला १० महिन्यांचा वेळ का लागला? सूरुवातीला सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १३ हजार ६०० रुपयांनी अनुदान दिले होते. मग नंतरच्या काळात सरकारला या विषयावर एक तज्ञ समिती नेमण्याची आवश्यकता वाटली. त्यातूनही मदत देण्याचा आव सरकारने आणला. परंतू शासन निर्णयामध्ये त्यांचा हा खोटारडेपणा उघड झाला. त्या आदेशामध्ये त्यानी ८ हजार ५०० रुपयानुसार मदत देण्याबाबत सांगितले. शेतकऱ्यांना मदत देतानाच सरकार एवढा का विचार करत आहे ? त्यातही विरोधी पक्षाकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर हा शासन आदेश काढला. त्यानंतरही मदत मिळण्यास शेतकऱ्यांना प्रतिक्षाच करावी लागल्याचे चित्र आहे. आता काही दिवसापासून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सूरुवात झाल्याचे दिसू लागले आहे. मात्र आता या मदतीची रक्कम ८ हजार ५०० रुपये सुध्दा नसल्याचे चित्र आहे. ही रक्कम ४ ते ५ हजार रुपये एवढीच मिळत आहे. शेतकऱ्यांचे सरकार असे म्हणून कोट्यवधींच्या जाहीराती करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची फसवणुक करताना काहीच वाटले नाही का ? असा जळजळीत सवाल आ पाटील यांनी विचारला आहे.