धाराशिव (Dharashiv) शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाच्या चाळण झालेल्या रस्त्याकडे कोण पाहणार ? राजकीय मंडळीचे नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरांतर्गत रस्त्यावरुन आंदोलन !बांधकाम विभागाचा सवतीसारखा दुजाभाव !
धाराशिव शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाच्या चाळण झालेल्या रस्त्याकडे कोण पाहणार ?
राजकीय मंडळीचे नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरांतर्गत रस्त्यावरुन आंदोलन !
बांधकाम विभागाचा सवतीसारखा दुजाभाव !
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - शहरात नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक आक्रमक होऊन आंदोलन करीत आहेत. मात्र शहरातूनच राज्यमार्ग जाणाऱ्या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या रस्त्याच्या दुरुस्तीला सवती सारखा दुजाभाव करत आहे.
धाराशिव शहरातून धाराशिव ते बार्शी, तुळजापूर, संभाजीनगर व औसा असे राज्य मार्ग आहेत. या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना देखील ते याकडे डोळे झाक करीत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होत असून अनेकजण या अपघाताचा जखमी झाले आहेत.
..........................................................
शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, शरद पवार हायस्कूल, मराठी कन्या प्रशाला आदीसह इतर शैक्षणिक संकुल शहरात असल्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची सकाळ ८ वाजल्यापासून दुपारी १२ तर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. या रस्त्यावरून बससह इतर मोठी वाहने देखील जातात. त्यामुळे हे खड्डे चुकविताना मोटारसायकल, ऑटो रिक्षा व इतर छोट्या मोठ्या वाहनांचे सतत अपघात होत आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग कशासाठी दुर्लक्ष करीत आहे ? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांसह पालकांनी केला आहे.
............................................
रस्त्यांवर डांबर तर सोडाच कोळसा देखील उगाळलेला नाही !
रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची असते. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत किंवा इतर काही तांत्रिक बाबी असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करून देणे हे त्यांचे कर्तव्य असते. त्यासाठी शासन खास निधीची तरतूद देखील करून ठेवते. मार्च अखेरीस तो निधी कागदोपत्री कामे केली असे दाखवून हडप केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर काळे डांबर तर सोडाच काळा कोळसा देखील उगाळलेला जात नसल्याचे वास्तव दिसून येत आहे.
..............................................
रस्त्यांची अन् नागरिक अनभिज्ञ !
शहरातील नागरिक शहरांतर्गत असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आक्रमक होत आंदोलन करीत आहेत. मात्र मुख्य रस्ता असलेले रस्त्याची चाळण झालेली असताना देखील याकडे नागरिकांचे लक्ष का गेले नाही ? राजकीय मंडळी देखील आगामी नगरपरिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरांतर्गत असलेल्या खराब रस्त्यांवरून राजकारण करण्यातच आनंद घेत आहेत. राजकीय मंडळी नागरिकांचा आंदोलनासाठी उपयोग करून घेत आहेत मात्र नागरिक इतके मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेबाबत इतके अनभिज्ञ का व कसे झाले ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.