सामाजिक वनीकरणासह वनविभागाच्या वृक्ष लागवडीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार ! चौकशी करण्याची शीला उंबरे पेंढारकर यांची मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांचा पंचनामा
सामाजिक वनीकरणासह वनविभागाच्या वृक्ष लागवडीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार
चौकशी करण्याची शीला उंबरे पेंढारकर यांची मागणी
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांचा पंचनामा
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - सामाजिक वनीकरणासह वन विभागाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशनच्या अध्यक्ष शीला उंबरे- पेंढारकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक वनीकरण आणि वन विभागामार्फत दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केला जातो. वृक्ष लागवडीनंतर देखभाल व निगा ठेवली जात नाही. छोट्या रोपांची लागवड करून त्याचा खरेदी दर जादा दाखवून आर्थिक लूट केली जाते. या देयकासाठी शासनाच्या तिजोरीवर अधिकारी संगणमताने दरोडा टाकण्याचे काम करतात. या संदर्भात शासकीय देयकांच्या तपासणीची आवश्यकता आहे. लागवड केलेल्या रोपांच्या वाढीसाठी पाण्याची सोय केली जात नसल्याने रोपे जळून जात आहेत.खाजगी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करून जादा रकमेची देयके मर्जीतील ठेकदाराशी संगणमत करून आदा केली जातात. तसेच वृक्ष लागवडीच्या कामांसाठी स्थानिक मजुरांना डावलून बाहेरच्या मजुरांना कामे देऊन त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची अनेक महिला मजुरांची तक्रार आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये वृक्ष लागवड केलेल्या क्षेत्राची माहिती व तपशील देण्यास सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. वृक्ष लागवड निविदा प्रक्रियेचा तपशील जाहीर केला जात नाही. खाजगी लाकूड तोड मशीनवर येणारी झाडे, त्याची संख्या याबाबत सामाजिक वनीकरण वन विभाग आहे. वृक्ष तोडीसाठी वन विभाग परवाना देणाऱ्या नोंदीची माहिती देत नाहीत. वृक्षांची कत्तल करून बेकादेशीर वाहतूक केली जाते. मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नाही या गंभीर बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वस्तुस्थितीजन्य अहवाल द्यावा व गैरप्रकाराला आळा घालण्यात अशी मागणी केली आहे. हे सर्व कारनामे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चोबे, वन विभागाचे उपविभागीय अधिकारी पौळ यांच्यासह तुळजापूर, उस्मानाबाद विभागाचे वन अधिकारी चौगुले, उमरगा-लोहारा आणि भूम, परंडा, कळब व वाशी येथील अधिकाऱ्यांनी संगणमताने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर दरोडा टाकण्याची तक्रार उंबरे-पेंढारकर यांनी केली आहे.