राज्याचे सार्वजनिक आरोग्य प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघात गावगुंडाची दहशत वाढली डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या गावगुंडाना तात्काळ अटक करण्याची मागणी डॉक्टरांचे काळ्याफिती लावून कामकाज सुरु
राज्याचे सार्वजनिक आरोग्य प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघात गावगुंडाची दहशत वाढली
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या गावगुंडाना तात्काळ अटक करण्याची मागणी
डॉक्टरांचे काळ्याफिती लावून कामकाज सुरु
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना गाव गुंडांनी घेराव घालून अरे रवी ची भाषा वापरत वाद घालून बेदम मारहाण केली. त्यामुळे संबंधित गाव गुंडावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट- अ संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे दि.३ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.१ ऑगस्ट वाशी तालुक्यातील तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ नवनाथ बाबासाहेब घुले यांना तेरखेडा येथीलच काही गाव गुंडांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच घेराव घालून अरे रव्याची भाषा वापरत वाद घालून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीस तात्काळ अटक करून योग्य ती कलम लावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आरोपी जोपर्यंत अटक होत नाही. तोपर्यंत तीन दिवस काळ्या पिती लावून कामकाज करू. त्यानंतर योग्य कारवाई न झाल्यास अत्यावश्यक सेवा वगळून कामकाज बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे नमूद केले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ महेश गुरव, सचिव डॉ रोहित राठोड, डॉ महेश गिरी, डॉ. एन.ए. माने, डॉ अविनाश भावे, डॉ. आर बी. पांडे, डॉ एस.एस. जाधव, डॉ सुमित मुंडे, डॉ सी.आर. बडे, डॉ अहमद खान, डॉ सचिन पाटील, एस.एस. पाटील आदीसह इतर डॉक्टरांच्या सह्या आहेत.
..........................................
मला व माझ्या परिवाराला धोका - डॉ घुले
तेरखेडा येथील गावगुंडापासून मला व माझ्या परिवाराला धोका निर्माण झाला आहे. आम्ही जीव मुठीत घेऊन काम करीत असून अशा गुंडांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी. त्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची देखील २४ तास नियुक्ती करण्यात यावी. आम्ही आता असुरक्षित असल्यामुळे माझी तेथून बदली करण्यात यावी अशी मागणी डॉ नवनाथ बाबासाहेब घुले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.