पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना उपळेकर यांनी दिला संविधान ग्रंथ भेट उपळेकर यांच्या माध्यमातून होतेय संविधानाची गावोगावी ओळख
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना उपळेकर यांनी दिला संविधान ग्रंथ भेट
उपळेकर यांच्या माध्यमातून होतेय संविधानाची गावोगावी ओळख
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सामाजिक कार्यकर्ते नवनाथ उपळेकर यांनी भारतीय संविधान हा ग्रंथ दि.३० ऑगस्ट रोजी भेट दिला आहे.
भारतीय संविधान व दैनंदिन जीवनातील व्यवहाराची सांगड घातल्यास प्रत्येक नागरिकास जीवन जगणे अतिशय सुकर व आनंददायी होते. कारण संविधानामध्ये सर्व प्रकारची मार्गदर्शक तत्वे असून कोणावर अत्याचार करू नये यापासून अत्याचार केल्यास कोणत्या कलमान्वये शिक्षा होऊ शकते ? याची तरतूद देखील केलेली आहे. मात्र अनेकजणांना या संविधानामधील विविध नियम, कायदे व कलमे याची माहिती नाही. त्यामुळे ती माहिती व्हावी या उद्देशाने नवनाथ दशरथ उपळेकर हे प्रत्येक गावी जाऊन सरपंच, उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना हा मार्गदर्शक ग्रंथ भेट देत आहेत. त्यामुळे संविधानाची जनजागृती होत आहे. तर त्यांच्या अनोख्या उपक्रमामुळे संविधानाची ओळख गावोगावी होऊ लागली आहे.
नवनाथ उपळेकर हे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गावोगावी जाऊन तेथील सरपंच, उपसपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन भारतीय संविधान तयार केले आहे. यामध्ये राजकीय कारभार कसा करावा ? देशाऊ कायदा सुव्यवस्था कशी अबाधित ठेवावी ? सर्व जाती, धर्मातील लोक गुण्यागोविंदाने व आनंदाने कसे राहतील ? प्रत्येकाने कायद्याचे पालन केले तर त्याचा समाज व्यवस्थेवर चांगला परिणाम कसा होतो ? आदींसह इतर विविध मार्गदर्शक तत्वे व नियम संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. हेच मानवाला समभाव शिकविणारे संविधान उपळेकर अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायतला भेट देत आहेत. त्यामुळे देश, राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतचा कारभार कोणत्या नियमाने व कसा करावा ? सरपंच, उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची आचारसंहिता काय असते ? तसेच गावच्या विकासासाठी आलेला निधी योग्य प्रकारे विकास कामांसाठीच कसा खर्च करावा ? याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करायची असेल तर गावातील दारु, गुटखा, मटका व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणत्या कायद्यान्वये तरतूद आहे ? याची माहिती देखील प्रत्येक गावोगावच्या नागरिकांना होऊ लागली आहे. तसेच दारू पिणे हा गुन्हा असून गावातील दारू बंद करण्यासाठी कोणत्या कलमान्वये ठराव पारित केला पाहिजे ? याची सहजासहजी माहिती पुरुषांसह महिलांना देखील होऊ लागली आहे. विशेष म्हणजे छोटे-मोठे भांडण- तंटे देखील मिटविण्यासाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. उपळेकर यांनी आजपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, पोलीस निरीक्षक नामदेव जाधव, रविंद्र गायकवाड, काँग्रेसचे विश्वास शिंदे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राजाभाऊ शेरखाने, ऍड. हुंबे, सरपंच दीदी लोकेश काळे, सुहास घोगरे, सुरेश नाईकनवरे, भीमराव साठे, निर्मला चांदणे, सीमा मडके, श्याम पाटील, गोरख दहिभाते, पंस माजी सदस्य रामभाऊ पडवळ, आदींसह अनेक गावच्या सरपंच, उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना संविधान हा ग्रंथ भेट दिला आहे. या गावांमध्ये तेर, ढोकी, हिंगळजवाडी, किनी, खेड, सांगवी, उपळा (मा), पाडोळी (आ), मोहा, पिंपरी (बे), पळसप, वरुडा, दारफळ, सारोळा, सांगवी या ग्रामपंचायतचा समावेश असून उर्वरित ग्रामपंचायतींना भेट देण्यात येणार आहे. तसेच इतर सर्व ग्रामपंचायतला संविधान भेट देण्यात येणार आहे.
..............................................
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना अतिशय मेहनत करून हे संविधान अर्पण केले आहे. या संविधानामुळे आपला देश एकसंघ राहीलेला आहे. तर देशात अनेक जाती, धर्म, पंथ व संस्कृती असताना देखील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. तसेच सर्व नागरिकांना समान हक्क असून प्रत्येकजण नियमांचे पालन करून आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्या गावचा कारभार कसा करावा ? याची माहिती सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना देखील व्हावी. विशेष म्हणजे यामुळे प्रत्येकांमध्ये वैचारिक परिवर्तन होत असून मानवता टिकवून ठेवण्याची कायमची ताकद फक्त संविधानात असल्यामुळे मी भारतीय संविधान ग्रंथ प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देत असल्याचे नवनाथ उपळेकर यांनी सांगितले.
...........................
पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना माहिती देणार - कुलकर्णी
शालेय विद्यार्थ्यांना संविधानामधील विविध कलमे व त्या कलमांतर्गत कशाची तरतूद केली आहे याची माहिती असणे आवश्यक आहे ? ही माहिती त्यांना शालेय जीवनापासून मिळावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन पुढाकार घेणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत संबंधित पोलीस विभागाचे अधिकारी, एन.जी.ओ. जाऊन जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.