पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे ठाम आश्वासन पाचपिंपळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार
पाचपिंपळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार
पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे ठाम आश्वासन
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या पाहिजे. यासाठी तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर करावा. या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाचपिंपळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दि.८ ऑगस्ट रोजी दिले.
परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, दत्ता साळुंके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजंल शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, सरपंच वंदना चौधरी, माऊली गोडसे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, गावच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. गावात सुरू असलेली कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी सुरु असलेल्या कामांना वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी. तर झालेली कामे टिकून राहतील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच पाचपिंपळा येथे लवकरात लवकर शेतकरी व पशू पालकांसाठी पशू वैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सावंत यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत ६९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे, जन सुविधा योजनेतंर्गत गावातील सिमेंट रस्त्यासाठी २० लाख रूपये, २५/१५ या लेखाशिर्षातून गावातील सिमेंट रस्त्याच्या १० लाख रुपयांच्या कामाचे व इतर विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.