शेतकऱ्यांना अग्रीम, अनुदान नक्की मदत मिळणार - आ. पाटील
शेतकऱ्यांना अग्रीम, अनुदान नक्की मदत मिळणार - आ. पाटील
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - पावसाने ओढ दिल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादकता घटणार आहे. त्यामुळे या अग्रीम रक्कमेसह राष्ट्रीय आपत्ती मदत निधी व राज्य आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ व एसडईआरएफ) या माध्यमातून नक्की व आवर्जून मदत मिळणार असल्याचे आश्वासन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२८ ऑगस्ट रोजी दिले.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पुनगडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, पाऊस नसल्यामुळे पिके वाया गेल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मदत मिळणे अत्यावश्यक आहे. पीक विमा योजनेतून २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्यासाठी २१ दिवसांचा पावसाचा खंड हा निकष बरोबर आहे. परंतू संपूर्ण जिल्हाभरातील पिकांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळापैकी ३३ मंडळात पंचनामे चालू आहेत. उर्वरित ठिकाणी देखील पंचनामे करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे योग्य प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी केली असल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांना अग्रीन देय अनुदान व अनुदान निश्चितपणे मिळतील यासाठी सर्व स्तरावर बैठका सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाचा अंदाज सांगणाऱ्या हवामान तज्ञांचा देखील अंदाज चुकलेला आहे असे सांगत पाऊस पडत नसल्यामुळे वातावरण अतिशय चिंतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर आजच्या जनता दरबारामध्ये रेल्वे भूसंपादन संदर्भात ८ गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. उर्वरित ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या काही अडचणी असतील त्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात अडचणी मांडाव्यात असे त्यांनी आवाहन केले. या शेतकऱ्यांना मावेजा कमी मिळेल असे काही लोकांनी बैठका घेऊन सांगत त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला असल्याचे सांगत खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. परंतू वस्तुस्थिती वेगळी असून एमआयडीसीतील जमिनीला जो दर दिला. त्यापेक्षा जास्तीचा दर दिला जाईल असे त्यांनी नमूद केले. तसेच धाराशिव येथील बस स्थानक ७ हेक्टर जागेवर होणार असून त्यामध्ये म्युझियम करण्यात येणार आहे. तसेच अडीचशे नागरिक बसतील अशा आकाराचे सुसज्ज असे हॉटेल देखील साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्हा स्टेडियम हे पुणे येथील बालेवाडी कॉम्प्लेक्सच्या धरतीवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्यात येणार असून याचा आराखडा आर्किटेक्चर शशी प्रभू हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.