पहिल्याच वर्षी लेडीज क्लबच्या मंगळा गौरीला महिलांच्या गर्दीचा उच्चांक देशभक्तीपर गीतांसह विविध गीतांवर महिलांनी केले नृत्य सादर
पहिल्याच वर्षी लेडीज क्लबच्या मंगळा गौरीला महिलांच्या गर्दीचा उच्चांक
देशभक्तीपर गीतांसह विविध गीतांवर महिलांनी केले नृत्य सादर
धाराशिव येथील लेडीज क्लब आयोजित, मंगळा गौरी स्पर्धेला जिल्हाभरातून नाहीतर बाहेरील जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत विक्रमी गर्दी केली. लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी यंदा लेडीज क्लबच्यावतीने पहिल्यांदाच मंगळा गौर स्पर्धेचे आयोजन केले होते. दि. २९ ऑगस्ट रोजी सायं. ५ वा. मंगळा गौरीच्या पूजनाने या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, मी दरवर्षी तेरमध्ये मंगळागौर महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करते. महिला या सणाला खूप मोठा प्रतिसाद देतात. पारंपारिक गाण्यावर झिम्मा, फुगडी आणि पारंपरिक खेळाचा आनंद घेतात. धाराशिव मध्ये ही याच धर्तीवर हा सण साजरा करण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. महिलांनी इतका सुंदर प्रतिसाद दिलेला पाहून खूप आनंद होतोय. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळणं महत्त्वाचे नसून यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या. त्या त्यांची कला सादर करण्यासाठी मंचावर आल्या ही खूप मोठी गोष्ट आहे.
दुपारी ३ वाजल्यापासून लेडीज क्लबच्या प्रांगणामध्ये महिलांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सायंकाळी ६ वाजता संपूर्ण क्लबचे मैदान गर्दीने फुलून आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या सुविद्य पत्नी अस्मिता ओंबासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी महिमा कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून २३ ग्रुपने या मंगळा गौर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. १ लाख रुपयांची रोख पारितोषिके हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. तर लेडीज क्लबच्या अध्यक्षा पाटील व त्यांच्या ग्रुपने सादर केलेल्या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंगळाज्ञगौर स्पर्धेच्या ५० हजार रुपये रोख प्रथम पारितोषिक विजेते ठरले विभागून ढोकी येथील आशा प्रवर्तक ग्रुप, तुळजापूर येथील महालक्ष्मी माहेरवाशिन ग्रुप तर लोहारा येथील सप्तशृंगी ग्रुप तर ३० हजार रुपये हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाचे विजेते विभागून तुळजापूर येथील टाटा ग्रुप, येरमाळा येथील येडेश्वरी ग्रुप व येडशी येथील ओळख स्वतःची ग्रुप तसेच तिसऱ्या क्रमांकावर धाराशिव येथील महसूल रणरागिणी ग्रुप, धाराशिव येथीलच रॉयल ग्रुप व वाशी येथील अजिंक्य टीचर्स ग्रुप यांनी २० हजार रुपयांचे बक्षीस विभागून पटकावले. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या स्पर्धेत स्पर्धक नसलेल्या महिलांनी व्यासपीठाच्या खाली नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. विजेत्यांना लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी केसकर यांनी केले. यावेळी लेडीज क्लबच्या सर्व सदस्या व जिल्हाभरातून आलेल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
...........................
तुळजापूर येथील तुळजापूर केंचेश्वर ग्रुप टाटा ग्रुपने घागर घुमू दे तर महालक्ष्मी माहेरवाशीण, बार्शी येथील रण रागीणी ग्रुप, लोहारा येथील सप्तशृंगी ग्रुपने बाईपण भारी देवा तसेच वाशी येथील अजिंक्य टीचर्स ग्रुप, येरमाळा येथील येडेश्वरी ग्रुप, येडशी येथील ओळख स्वतःची ग्रुप, ढोकी येथील आशा गट प्रवर्तक ग्रुप, मंगळा गौरी ग्रुप, ओम नमो शिवाय ग्रुप व माता रमाई ग्रुपने घे भरारी या गाण्यावर तर शिंगोली येथील लेक बाई सर्व काही ग्रुपने रिमिक्स गाण्यावर तसेच धाराशिव येथील महालक्ष्मी ग्रुप, सखी शांतिनिकेतन ग्रुप, तेजस्विनी ग्रुप व रॉयल ग्रुप यांनी डोंगरी माता या गाण्यावर तर धाराशिव येथीलच सेव्हन स्टार ग्रुपने घागर घुमू दे या गाण्यावर तसेच स्वयंवर ग्रुप व सावित्री सखी योगा ग्रुपने घागर घुमू दे या गाण्यावर नृत्य सादर केले. यावेळी आली गौर आली... सोनं पावली आली.... आदींसह विविध गीतावर महिलांनी आपले नृत्य कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.