रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांना डावलले ! रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची मागणी
रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांना डावलले !
राजशिष्टाचार गैरवर्तुणुक करणाऱ्या रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची मागणी
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - येथील रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभाच्या कोनशिलेवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना डावलले आहे. त्यामुळे शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी निषेध व्यक्त करीत राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी दि.६ ऑगस्ट रोजी केली आहे.
धाराशिव येथील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परंतू राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे नाव कोनशिलेवर नसल्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्याला डावलून हा कार्यक्रम आयोजित करून रेल्वे प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक दिली गेल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.