केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा गंभीर आरोप आ. कैलास पाटील यांनी केला आहे

केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीच्या इशाऱ्यावर चालते - आ. कैलास पाटील 

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे सध्या उद्योगपती व विमा कंपनीच्या इशाऱ्यावर चालतात याचा धडधडीत पुरावा पुन्हा एकदा समोर आला आहे. केंद्राची ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी गेल्या ८-१० महिन्यांपासून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकार व खुद्द कृषी मंत्र्याच्या आदेशाचे पालन करत नाही. शिवाय या सर्वांनाच पत्र पाठवून नियमांवर बोट ठेवून कंपनी त्यांचे तोंड बंद करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा अतिशय गंभीर आरोप आ. कैलास पाटील यांनी करीत केंद्र व राज्य सरकारवर घणाघात केला आहे.

जिल्ह्यात खरीप २०२२ मध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविल्याने त्यांना नुकसान भरपाईची व आपल्या हक्काची रक्कम मिळणार याची अपेक्षा होती. मात्र कंपनीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचा चुकीचा अर्थ लावून निम्मीच रक्कम वितरीत केली आहे. शिवाय जी रक्कम वाटप केली त्यामध्येही असमानता दिसून येत आहे. एकाच गट नंबरमधल्या दोन सख्या भावांपैकी एकाला १५ हजार तर दुसऱ्याला दिड हजार अशी रक्कम दिली आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी नुकसान सारखेच असतानाही रक्कम देताना ती असमान देण्यामागे काही आधार असायला हवा. त्या आधाराची माहिती आम्ही गेली ८-१० महिने मागत आहोत. त्यामध्ये नुकसानीच्या वेळी झालेल्या पंचनामे हाच खरा पुरावा असणार असून त्यात नुकसानीचे क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी दिलेली असते. त्यामुळे तिथे काही गोंधळ झाला आहे का ? हे पाहणे महत्वाचे आहे. त्यासाठी पंचनाम्याच्या प्रतीची मागणी साधारण डिसेंबर २०२२ पासून केली जात आहे. मात्र आम्ही मागणी केल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये जिल्हाधिकारी, पुढे विभागीय आयुक्त व नंतर राज्य सरकार सरते शेवटी तर खुद्द कृषी मंत्र्यांनीही पंचनाम्याच्या प्रतीची मागणी केली होती. अधिवेशनाच्या काळात आपण लक्षवेधी मांडून त्याबद्दल विचारणा केल्यानंतर तिथेही पंचनामे देण्यासाठी काही मुदत दिली होती. मात्र आता कंपनीने त्यांना थेट पत्र पाठवून अशा प्रकारे पंचनामे देण्याचे कुठेही शासन निर्णयामध्ये किंवा योजनेमध्ये तरतुद नसल्याचे कारण दिले आहे. याबाबत कंपनीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारची कंपनीला जाब विचारण्याची हिंमत आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता कितीही शेतकऱ्यांच्या भल्याचे सरकार असल्याचा कांगावा केला तरी त्याने काहीच फरक पडणार नसल्याचा टोला आ पाटील यांनी लगावला आहे. तसेच कंपनीला जाब विचारण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही पण आमच्यात असल्याची उपरोधक टीकाही त्यांनी केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेवटपर्यंत लढा देण्यासाठी सक्षम असल्याचे आ पाटील यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !