धाराशिव येथे आधुनिक बस स्थानक साकारणार - आ. पाटील
धाराशिव येथे आधुनिक बस स्थानक साकारणार - आ. पाटील
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - १०० दुकान गाळ्यांसह मोठे हॉटेल असलेले भव्य व्यापारी संकुल, कर्मचार्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने, प्रशस्त उपहारगृह, प्रवासी, चालक-वाहक विश्रांती कक्ष व तब्बल २२ फलाट (प्लॅटफॉर्म) असलेल्या धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे हे राज्यातील सर्वात सुंदर बसस्थानक ठरावे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना व संकल्पना जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी दि.२८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
गोरोबा काकांची भक्ती व तुळजाभवानी देवीची शक्ती, असा भक्ती व शक्तीपीठाचा अनोखा संयोग असलेल्या जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब बस स्थानकाच्या इमारतीत साकारले जाणार आहे. वास्तु विशारद अजय ठाकूर यांना तशा पध्दतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात मध्यवर्ती बस स्थानकाचे प्राथमिक संकल्प चित्र प्रकाशित करण्यात आले होते. आता या संपूर्ण परिसरावर साकारल्या जाणार्या अत्याधुनिक मध्यवर्ती बस स्थानकाचा सुधारीत ले-आऊट प्लॅन तयार करण्यात आला आहे. या सुधारीत आराखड्यातही जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारे काही महत्वपूर्ण बदल सूचविण्यात येणार आहेत. बसस्थानकाची जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने शहर व जिल्ह्याच्या सौंदर्यात नवीन बस स्थानकाच्या इमारतीमुळे भर पडणार असल्याची माहिती आ पाटील यांनी दिली आहे.
बस डेपोचेही नुतनीकरण
उपलब्ध असलेल्या तीन हेक्टर जागेवर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनतळ, प्रवासी कक्ष, प्रशस्त उपहारगृह, पार्सल विभाग, प्रतिक्षालय, जेनेरिक औषधालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, कर्मचार्यांसाठी निवासस्थाने आणि इतर अनुषंगीक आधुनिक सोयी-सुविधांचा यात समावेश असणार आहे. २२ फलाट असलेल्या या नवीन बस स्थानकाला जोडूनच असलेल्या बस डेपोचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या लेखी सूचना व संकल्पनांचे स्वागत
एकाच वेळी २२ बसगाड्या थांबू शकतील, अशा भव्य बस स्थानकाच्या इमारतीवर स्थानिक गौरवशाली इतिहास व संस्कृतीचे प्रतिबिंब साकारण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरातील नागरिकांनी त्यांच्या सूचना व अभिनव संकल्पना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात जमा कराव्यात. तसेच नागरिकांच्या योग्य सूचना व अभिनव संकल्पनांचा या आराखड्यात नक्की समावेश केला जाईल. त्यासाठी २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे आ पाटील यांनी सांगितले.