रानभाजी महोत्सवात शहरवासियांना मिळाली विविध भाज्यांची ओळख
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रानबाजी महोत्सवामुळे शहरवासीयांना पुन्हा नव्याने विविध रानभाज्यांची ओळख झाली. त्या भाज्यांची खरेदी करण्यासाठी त्यांची दिवसभर झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे नैसर्गिक गुणधर्म या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणारे आहेत.
कृषी विभागाच्या माध्यमातून पावसाळ्याच्या दिवसात व पावसाच्या पाण्यावर उगवून लुसलुशीत असलेल्या व रासायनिक केमिकलचा एक अंश देखील नसलेल्या रानभाज्या शहरवासियांना उपलब्ध झाल्या आहेत.
धान्य व कडधान्ये यांच्यानंतर मानवी आहारात प्रमुख घटक म्हणून भाज्यांना प्राधान्य दिले जाते. विविध गुणधर्माने रानभाज्या परिपूर्ण असतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्या व रानफळांमध्ये करटुले, तोंडली, हादगा, कुंजीर, चिघळ, तांदुळाजा, लसूणघास, कुरडू, पाथरी, कढीपत्ता, आघाडा, अंबाडी, बांबू, केना, आळूचे पान, उंबर, पिंपळ, शेवगा, कपाळफुटी, गुळवेल, कोरफड, काशीद, फांजी, वासनवेल, काटेमाठ, सराटा, ओवापान, कवठ, मशरुम, चांदवेल व मोठा घोळ आदींसह विविध रानभाज्या जिल्ह्यात आढळून येतात. या वनस्पती, फळे व रानभाज्या शेतकऱ्यांनी शोधून काढून जपल्या आहेत. तसेच रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनविण्यात येतात. तर भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून वरण-भजी आदी खाद्यपदार्थ यापासून तयार केले जातात. विविध रानभाज्या या मधुमेह, पोटदुखी व खोकला आदींवरही औषधी म्हणून उपयुक्त ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यामुळे या रानभाज्यांची ओळख आस्वाद व त्यांचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास भेट देऊन भाज्यांची माहिती करून घेत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली.