शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा परतावा लागू करण्यास विमा कंपनीस आदेशित करावे
शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा परतावा लागू करण्यास विमा कंपनीस आदेशित करावे
धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा परतावा (मिड सिझन) लागू करण्यासाठी विमा कंपनीस आदेशीत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.१८ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात पावसाच्या दिर्घ खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पनात ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात यंदा पेरण्या उशीराने झाल्या. जुलै व ऑगस्ट महिन्यात २३ दिवसांपासून पावसाने संपूर्ण जिल्ह्यात उघदीप दिल्यामुळे संपूर्ण सोयाबीन, तुर, मुग, उडीद व कापूस आदी पिकांची वाढ खुंटलेली आहे. तसेच ऐन फुलाच्या अवस्थेमध्ये पाण्यावाचून पिके सुकून जावून माना टाकत असून हे पावसाचा खंडकाळ वाढण्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय प्रधानमंत्री पीक विमा योजना समितीची बैठक आयोजित करुन विमा कंपनीस प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (मिड सिझन) विमा लागू करण्यासाठी विमा कंपनीस आदेशित करावे. जर याबाबत त्वरीत कार्यवाही नाही केली तर विमा कंपनी विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.