जलद कृती बलाच्या जवानांचे शहरात पथ संंचलनजिल्ह्यात ५ दिवस करणार पथ संंचलन
जलद कृती बलाच्या जवानांचे शहरात पथ संंचलन
जिल्ह्यात ५ दिवस करणार पथ संंचलन
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - आगामी साजरे होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र महोत्सव, ईद मिलाद व दीपावली आदींसह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत. यादरम्यान कुठल्याही जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रितरित्या आनंदाने साजरे करावेत यासाठी जलद कृती बल (द्रुत कार्य बल- रॅपिड ऍक्शन फोर्स) च्या जवानांनी शहरातून दि.२३ ऑगस्ट रोजी पथ संचलन केले.
आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ईद मिलाद व दीपावली आदींसह इतर सर्व सण, उत्सव भयमुक्त वातावरणात नागरिकांना साजरे करता यावेत यासाठी जलद कृती बल (द्रुत कार्य बल- रॅपिड ऍक्शन फोर्स) च्या जवानांनी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथून पथ संंचालनास सुरुवात केली. ही रॅली काळा मारुती चौक, नेहरू चौक, विजय चौक, मदिना चौक, दर्गाह चौक, वैराग नाका, कुरेशी मोहल्ला व आजाद चौक मार्गे शहर पोलीस स्टेशन अशी काढण्यात आली. यामध्ये जलद कृती बल (द्रुत कृती बल - रॅपिड ऍक्शन फोर्स) चे ६० जवान यांच्यासह शहर व आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, रॅपिड ऍक्शन फोर्स डेप्युटी कमांडंट विरेंद्रकुमार यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, महिला सपोनि घोडगे, सपोनि चव्हाण आदींसह रॅपिड ऍक्शन फोर्सचे ६० जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या पथ संचालनामध्ये पोलीस दलामध्ये वापरण्यात येणारे दंगल नियंत्रण वाहन, ॲन्टी राईड गन, गॅस गन, पंप ऍक्शन, एके- ४७ आदी शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला होता.
...........................................
येणारे सर्व सण नागरिकांना शांततेमध्ये साजरे करता यावेत. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे पथक संचालन करण्यात आले. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही सण उत्सवामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो नागरिकांनी हाणून पाडावा यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांना माहिती देण्यात येत आहे. विशेषतः हिंदू - मुस्लिम व दलित - सवर्ण असे जातीय दंगली असू नयेत त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. जर एखाद्या ठिकाणी दंगल उसळली तर कोणत्याही व्यक्तीला शारीरिक इजा करून त्याचे जीवन उध्वस्त करण्याचा या जवानांचा कोणताही प्रयत्न नाही मात्र ती आटोक्यात आणण्यासाठी अशा व्यक्तींच्या कमरेखाली म्हणजे पायावर गोळी झाडली जाईल असा इशारा रॅपिड ऍक्शन फोर्सचे डेप्युटी कमांडंट विरेंद्रकुमार यादव यांनी दिला.