कांद्याला हमीभाव भाव देण्यासह जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी - निटुरे
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य सरकारकडून कांद्याला प्रती क्विंटल ५ हजार रुपयांचा हमी भाव देण्यात यावा. तसेच जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्यासह शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. अन्यथा मंत्र्यांच्या बंगल्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, केंद्र व राज्य सरकारकडून कांद्याला प्रती क्विंटल ५ हजार रुपयांचा हमी भाव मिळणे गरजेचे आहे. कारण शेतकरी कांदा उत्पादन करण्यासाठी मेहनत घेत असतो. परंतू त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालासह कांद्याला हमी मिळणे गरजेचे आहे. तसेच कांद्यावरील निर्यात कर लादू नये. यासाठीच महाराष्ट्र सरकारने निर्णय घेवून कांद्याला प्रती क्विंटल ५ हजार रुपयांचा हमी भाव देण्यात यावा. यासाठी राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे अहवाल सादर करून हमी भाव देण्यासाठी शिफारस करुन हा दर जाहिर करण्यात यावा. अन्यथा मंत्र्यांच्या बंगल्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात येईल. तसेच
दुष्काळी छायेतील शेतकऱ्यांना मदत करून जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था होणेसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. कारण शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असल्यामुळे सरकारकडून दिलासा मिळणे गरजेचे आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी व त्याचे पशुधन जगले पाहिजे यासाठी सरकारच्यावतीने चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे. सद्यस्थितीत जो शेतमाल निघतो त्याला हमीभाव मिळणे अत्यंत गरजेचे असून सरकारचे धोरण शेतकऱ्यांना सहाय्यभूत असले पाहिजे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असून जनावरांना चारा व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून
अवर्षणग्रस्त भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्यामुळे जनावारांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासह शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी राष्ट्रीय अध्यक्ष निटुरे यांनी केली आहे.
- Get link
- X
- Other Apps