बोगस गुंठेवारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
बोगस गुंठेवारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - लोहारा (बु) नगर पंचायतच्या हद्दीत बोगस गुंठेवारी करून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत भगवान काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
लोहारा (बु) नगर पंचायतच्या हद्दीतील जमीन सर्वे नंबर १७५/१, १२०/१, १५४ ३ पोट हिस्से, १५७ व २५८/१ या जमिनीवर गुंठेवारी व एन ए ले आऊट शासनाच्या नियमानुसार करण्यात आलेली नाही. तसेच या परिसरात रस्ते, नाली व लाईट यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. कोणत्याही सुविधा नसताना याची विक्री करताना कागदोपत्री सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास असमाधानकारक दिशाभूल करून फसवणुकीच्या हेतूने खोटा अहवाल सादर केला आहे. मुख्याधिकारी नगरपंचायत कारल्याने दिलेला हा अहवाल अतिशय चुकीचा असल्यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमार्फत त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. तसेच शासनाचे नुकसान करणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी प्रशांत काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
.............................
विशेष म्हणजे या गुंठेवारीपैकी ४० गुंठे जागा शाळेसाठी दानपत्राद्वारे दान केलेली असताना देखील जागेचे बनावट कागदपत्रे व मोजमाप नकाशाद्वारे केलेली गुंठेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेली आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही. उलट नगर पंचायतमधील संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट अहवाल देऊन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.