५६ वर्षानंतर पठाण कुटुंबियांना मिळाला न्याय
५६ वर्षानंतर पठाण कुटुंबियांना मिळाला न्याय
भूम दि.२८ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील एका जमिनीचा वाद न्यायालयामध्ये ५६ वर्षापासून सुरू होता. तो निवाडा होण्यापूर्वीच संबंधित वादीचा मृत्यू झाला मात्र न्यायाधिशांनी या प्रकरणाचा न्याय निवाडा करून संबंधित कुटुंबाला न्याय देऊन दिलासा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अहमदखाँ पठाण यांनी चिंचपूर (ढगे) येथील जमिनी संदर्भात ते कुळ असल्याने मनाई मिळण्यासंबंधी परंडा येथील न्यायालयात सन १९६७ साली दावा दाखल केला होता. हा दावा १९७० साली भूम न्यायालयात वर्ग करण्यात आला. या दाव्यात भूम येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चेंडके यांनी अहमदखॉंन यांचा दावा खर्चासह मंजूर केला. मात्र अहमदखाँ मयत असल्यामुळे त्यांचे वारस अमीरखाँ अहमदखॉ पठाण व मोशनखाँचा अहमदखॉ पठाण रा. चिंचपूर (ढगे) व इतर यांच्या हक्कात निकाल देऊन प्रतिवादी यांची सन २००४ सालामध्ये झालेली नोंदणीकृत खरेदी खते रद्द केली. तसेच प्रतिवादीस त्या जमीनीत जाण्यास मनाई केली. हा निकाल देताना न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांचे कुळ हक्का संबंधीच्या अनेक निवाड्याचा हवाला देऊन ७६ पानी निकालपत्र दिलेले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. ५६ वर्षानंतर न्यायालयाने न्याय दिला आहे. या प्रकरणात वादीच्यावतीने ऍड.सी.बी. सुपनर व ऍड.संदिप ढगे यांनी काम पाहिले.