गटारीच्या तुंबलेल्या घाण पाण्याचा १२ वर्षापासून वनवास संपेना ? दुर्गंधीयुक्त पाण्याचा निपटारा केंव्हा होणार ?
गटारीच्या तुंबलेल्या घाण पाण्याचा १२ वर्षापासून वनवास संपेना ?
दुर्गंधीयुक्त पाण्याचा निपटाराच केंव्हा होणार ?
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी राहत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह लगत तसेच इंदिरानगर व बाजार रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरच गेल्या १३ वर्षांपासून शहरातून वाहणाऱ्या गटारीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा डबके तयार झाले आहे. या दुर्गंधी मुळे या परिसरातील नागरिक सतत आजारी पडत आहेत. तर प्रवाशांना या पाण्यातील दुर्गंधीचा सेंट आपल्या पायांना लावूनच जावे लागते.
या ठिकाणी वस्तीग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन या डबक्यातील साठलेले दुर्गंधीयुक्त पाणी वाहते करण्यासाठी कुठलेही पावले उचलताना दिसत नाही.
.............................................
राजकीय मंडळी फक्त मतांचा जोगवा मागतात !
प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी या भागातील नागरिकांच्या दारोदार फिरून मतांचा जोगवा मागतात. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेच या भागातील सर्व समस्या सोडविल्या जातील अशी कोरडी आश्वासने देतात. मात्र गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणची सतत दुर्गंधीयुक्त पाण्याच्या साचलेल्या डबक्याची समस्या आजपर्यंत सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.
.......................................
नगर परिषद पुढाकार घेणार का ?
नगर परिषदेचा स्वच्छता विभाग देखील येथील कामे करण्याकडे का दुर्लक्ष करीत आहे ? याचे कारण देखील अद्यापपर्यंत येथील नागरिकांना समजले नाही. सध्या नगर परिषदेवर प्रशासकाची सत्ता सुरू असून प्रत्येक कामे मुख्याधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली केली जात आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलावीत असा टाहो नागरिक फोडीत आहेत.