उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सकल मराठा समाजाने केली मागणी अंतरवाली सराटी प्रकरणी जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सकल मराठा समाजाने केली मागणी
अंतरवाली सराटी प्रकरणी जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या मराठा समाजातील आंदोलक महिला व बालक यांना अतिशय क्रुरपणे व अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत. तर लाटी चार्ज करण्याच्या सूचना देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा. तसेच आंदोलकांवरती चुकीचे नोंद केलेले गुन्हे तात्काळ परत घ्यावेत. त्याबरोबरच मराठा आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी. अन्यथा सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा थेट इशाराच एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव शहरात मराठा तरुणांनी शहरातून रॅली काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ताजमहल टॉकीज, देशपांडे स्टॅण्ड, अण्णाभाऊ साठे चौक, जुना एसटी बस डेपो चौक, विजय चौक, नेहरु चौक, माऊली चौक, निंबाळकर गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफीस, आर्य समाज चौक, जिजाऊ चौक, भाई उद्धवराव पाटील कन्या प्रशाला, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत, तेरणा महाविद्यालय, सांजा चौक, सांजा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, समता नगर, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीत व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये मराठा समाजातील तरुण व महिला कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात गगनभेदी घोषणा देत लाठीचार्ज प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
दरम्या शम्स चौक व नगर परिषद येथील कॉम्प्लेक्सवर दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र या दगडफेकीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी, कोणीही जखमी झालेले नाही किंवा वित्त हानी झालेली नाही. त्यामुळे हा बंद शांततेत पार पडला.
पोलीस प्रशासनाने देखील या पार्श्वभूमीवर तात्काळ जिल्हाभरात ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून हे आंदोलन व्यवस्थितरित्या हाताळले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील जिल्हावासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान कळंब, तुळजापूर, भूम, वाशी, परंडा, लोहारा व उमरगा आदी शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
..................
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात रीतसर मागणी करावी. तसेच कोणीही शासकीय किंवा खासगी मालमत्ता यांचे नुकसान करु नये. आपल्या मागण्यांसाठी शांततेचा मार्ग अवलंबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले.