उद्या हैद्राबाद-मराठवाडा मुक्तीसंग्राम माहिती नाट्यपटाचे सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण
उद्या हैद्राबाद-मराठवाडा मुक्तीसंग्राम माहिती नाट्यपटाचे सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण
मुंबई दि.३० (प्रतिनिधी) - राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्मित मुक्ती संग्राम (कथा हैद्राबाद- मराठवाड्याच्या संघर्षाची) या माहिती नाट्यपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या नाट्य माहितीपटाचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवर दि १ ऑक्टोबर रोजी, दुपारी १.३० वाजता करण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच हैद्राबाद - मराठवाडा मुक्ती संग्रामाची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असून या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच या नाट्य माहितीपटात अभिनेते अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, अभिनेत्री स्मिता शेवाळे या मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी भूमिका साकारली आहे. तसेच केदार दिवेकर यांनी संगीत दिग्दर्शन तर निखिल लांजेकर यांनी ध्वनी संयोजन व प्रतीक रेडीज यांनी कला दिग्दर्शन केले आहे.
हैद्राबाद-मराठवाडा मुक्ती संग्रामावरती उपलब्ध पुस्तके व संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे ७५ मिनिटांचा हा नाट्य माहितीपट तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे या नाट्य माहितीपटाचा लाभ राज्यातील प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले आहे.