ग्रामीण भागात साडेसात लाखाचा अवैध गुटखा साठवणूक करण्याचे धाडस वाढले !
ग्रामीण भागात साडेसात लाखाचा अवैध गुटखा साठवणूक करण्याचे धाडस वाढले !
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - जिल्हाभरात अवैध धंदे बोकाळले असून ग्रामीण भागात देखील लाखो रुपयांचा गुटखा साठवणूक करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्या एकाच्या घरातून तब्बल ७ लाख ५० हजार ७३४ रुपयांचा गुटखा धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३० रोजी ३.१५ वाजण्याच्या सुमारास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गायकवाड यांना अंबेजवळगा येथील माळवस्तीमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत असल्याची गोपनिय बातमी मिळाली. त्या बातमीच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन छापा मारुन कारवाई केली. यावेळी अंबेजवळगा येथील विशाल हनुमंत पवार हा पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला. पथकाने त्या घराची पाहणी केली. त्यामध्ये एकूण ७ पोते प्रत्येक पोत्यांमध्ये ३८५ पुडे लाल गोवा १००० किंमत अंदाजे १ लाख ३४ हजार ७५० रुपये, २ पोत्यांमध्ये १२० पुडे हिरवा गोवा १००० किंमत अंदाजे ४२ हजार रुपये, २४ पोत्यांमध्ये २४०० पुडे हिरा पान मसाला किंमत अंदाजे २ लाख ८८ हजार रुपये, ४६ पोत्यांमध्ये महा रेयॉल ७१७ तंबाखूचे ९२०० पुडे किंमत अंदाजे २ लाख ७६ हजार रुपये व एका पोत्यामध्ये जाफरानी जर्दा एक्स एल १ कंपनीचे २०८ पुडे किंमत अंदाजे ९ हजार ९८४ रुपये असा एकूण ७ लाख ५० हजार ७३४ रुपये किंमतीचा सुगंधीत सुपारी, गुटखा साठवण करुन हा गुटखा विक्री करण्यासाठी घरामध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेऊन गुटखा विक्री करणारा विशाल हनुमंत पवार याच्या विरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.३१ ऑगस्ट रोजी गुरंन २६१/२०२३, भा.दं.वि.सं. कलम- ३२८, २७२, २७३, १८८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी गायकवाड, सपोनि नेटके, पोलीस हवालदार भिमराव ढगे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.