डॉल्बी मुक्तीचा अंमल, विविध देखावे व पारंपारिक वेशभूषा ठरले आकर्षण वाजत गाजत गणपती बाप्पाला दिला निरोप !
डॉल्बी मुक्तीचा अंमल, विविध देखावे व पारंपारिक वेशभूषा ठरले आकर्षण
वाजत गाजत गणपती बाप्पाला दिला निरोप !
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान जल्लोषात गणेश भक्तांनी विविध गाण्यांवर ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला. तर हा जल्लोष पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे संपूर्ण रस्ते फुलून गेले होते. यावेळी पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशा, लेझीम पथक, बॅण्ड बाजा, हलगी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहर गणपतीमय झाले होते. मिरवणूक काढण्यापूर्वी वरुणराजाने हजेरी लावली होती. त्यामुळे मिरवणुकीत देखील सरी कोसळतात की काय? अशी भीती गणेश भक्तांमध्ये निर्माण झाली होती. मात्र शेवटपर्यंत एकही थेंब न पडल्यामुळे मिरवणूक जोषपूर्ण वातावरणामध्ये काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया..... पुढच्या वर्षी लवकर या....च्या जयघोषाने परीसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान, धाराशिव शहरातील वडगावकर कुटुंबियांच्यावतीने नागरिकांना प्रसादाचे (अल्पोपहार) वाटप करण्यात आले. याचा अनेकांनी लाभ घेतला. या मिरवणुकीत विविध देखावे उभारावेत आले होते. तर त्यामुळे गणेश भक्तांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता.
................
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी डॉल्बी मुक्त वातावरणात प्रत्येक सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनास जिल्हावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे गणेश मंडळांनी पारंपारिक ढोल, ताशा, बँड, हलगी व लेझीम पथकांचा वापर करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी सारखा असणारा डॉल्बीच्या जीव घेण्या दणदणापासून नागरिकांची मुक्तता झाली आहे. यापुढे प्रत्येक सण, उत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हावासियांनी केल्याचे या माध्यमातून दिसून आले.