अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करण्यासाठी उपोषण
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - सन २०२०-२१ च्या संच मान्यतेने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर दि.१८ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण केले.
२०२०-२१ च्या संच मान्यतेनुसार ते अतिरिक्त शिक्षक होते. शाळेची गरज लक्षात घेता त्यांचे तात्पुरते समायोजन करण्यात आले. परंतू त्या रिक्त जागेवर कायमस्वरुपी शिक्षक दिल्यामुळे काहीजणांच्या शाळा सतत बदलून देण्यात येत आहेत. सद्यस्थितीत त्यांच्यापैकी काहीजण तोंडी आदेशान्वये कार्यरत आहेत. त्यामुळ त्यांचे समायोजन केव्हा होणार ? असा सवाल करुन कायमस्वरुपी समायोजन होत नसल्यामुळे ते शिक्षक व त्यांचे कुटुंब मानसिक तणावात आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया झाल्यानंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. राज्यातील पुणेसह काही जिल्हा परिषदांनी शासनाच्या या आदेशानुसारच समायोजन केलेले आहे. तर जिल्ह्यातही त्या शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन व्हावे यासाठी शिक्षणाधिकार्यांकडे सातत्याने लेखी व तोंडी विनंती केली. परंतू यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. दि.१७ सप्टेंबरपर्यंत समायोजन करण्याच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे अतिरिक्त शिक्षक सविता मेटे, मंजुषा बामणे, अर्चना घुटे, दीपांजली मडके, भूषण नान्नजकर, अजिनाथ गायकवाड, अनिता देशमुख, सुमेध भागवत हे शिक्षक सहभागी झाले आहेत. मागणी मान्य होऊन कायमस्वरुपी समायोजन न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही अतिरिक्त शिक्षकांनी दिला आहे.
................
या उपोषणासाठी शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, कळंब तालुकाध्यक्ष दत्ता पवार, धाराशिव तालुकाध्यक्ष राहुल भंडारे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप म्हेत्रे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ऍड.तानाजी चौधरी, आप्पासाहेब गोरे, महादेव मेनकुदळे, सतीश एडके, लक्ष्मण जमाले, रावसाहेब घुटे, विक्रम पाटील, राजकुमार माने, विकास मगर आदींनी पाठींबा दिला आहे.