मराठा आरक्षणासाठी पोळी भाजो आंदोलन मराठा आमदारांचा केला तीव्र निषेध !
मराठा आरक्षणासाठी पोळी भाजो आंदोलन
मराठा आमदारांचा केला तीव्र निषेध !
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांनी पोळी भाजो आंदोलन करीत सर्वच पक्षातील मराठा आमदारांचा दि.९ सप्टेंबर रोजी जाहीर निषेध केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे निलेश साळुंके व अक्षय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र अद्यापही शासन दरबारी याची दखल घेतली गेली नसल्यामुळे मराठा आरक्षणाचे घोंगडे रिमझीम पावसात भिजत पडले आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. तर धाराशिव येथील सुरू असलेल्या आंदोलनामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारे शासनाचा निषेध केला जात आहे. तसेच आजच्या आंदोलनामध्ये आंदोलन स्थळी चूल मांडली. त्या चुलीवर तवा टाकून राजकीय लोकांनी मराठा समाजाच्या आयत्या मतांवर व जीवावर सत्ता उपभोगली. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारच्या निष्क्रियतेबद्दल तव्यावर पोळी भाजून आंदोलन करीत निषेध नोंदविला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन स्थळी येऊन सांजा, मेडसिंगा ग्रामपंचायतच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे.