उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार
- Get link
- X
- Other Apps
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तर
पुरस्कारासाठी निवड करताना गुणांकन करताना पुढील बाबीं विचारात घेतल्या जाणार आहेत. पर्यावरणपूरक मुर्ती - १० गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकॉल/प्लॅस्टिक विरहित) - १५ गुण, ध्वनी प्रदुषणरहीत वातावरण - ५ गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन आदी समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट - देखावा - २० गुण किंवा स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट देखावा - २५ गुण, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जाबद्दल जागरुकता निर्माण करणे, ऍम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य - २० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थींनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबद्दल केलेले कार्य - १५ गुण, महिला तसेच ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य - १५ गुण, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा - १० गुण, पारंपारिक तसेच देशी खेळाच्या स्पर्धा - १० गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा जसे की पाणी, प्रसाधन गृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस ५ गुण) असे एकूण १५० गुणांचे गुणांकन करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार स्पर्धा विजेत्यांची निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती राहील. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल दौंडे हे अध्यक्ष म्हणून तर सदस्य म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील शिक्षणशास्त्र विभागाचे डॉ.जितेंद्र शिंदे, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे अधिकारी कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश रोहिदास, पोलिस अधिकारी कानगुडे व सदस्य सचिव म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे हे आहेत.
निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देणार आहे. तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार स्पर्धा विजेत्यांची निवड करण्यासाठी तालुकास्तरावर पुढीलप्रमाणे समिती स्थापन केली आहे. तालुका निवड समिती अध्यक्ष म्हणून संबंधित तालुक्याचे तहसिलदार तर सदस्य म्हणून तालुकास्तरीय कला महाविद्यालयातील प्राध्यापक, संबधित तालुक्यातील प्रदुषण मंडळाचे अधिकारी, संबंधित तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित तालुक्याचे पोलिस निरीक्षक व सदस्य सचिव म्हणून नगर परिषद हद्दीत संबंधित मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी हे असतील. तसेच
तालुकास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव समिती संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांनी समिती गठीत करुन तालुकानिहाय सर्व गणेशोत्सव मंडळांची तपासणी करण्यात यावी. याप्रमाणे नोंदणीकृत गणेश मंडळांची तपासणी करुन त्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा समितीकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिल्या आहेत.
.........................
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासन निर्णयाप्रमाणे या स्पर्धेत भाग घेतलेल्या गणेश मंडळांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. पर्यावरणपूरक, स्थानिक लोकांचा जास्तीत जास्त सहभाग घेऊन या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. सार्वजनिक गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबरपर्यंत साजरा होत असल्याने सामाजिक भान ठेवून ध्वनी प्रदूषण विरहित, पर्यावरणपूरक साहित्य सामग्री वापरुन सजावट करावी. जास्तीत-जास्त महिलांना, शाळकरी मुलांना, समाजातील सर्व घटकांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. झाडे लावणे, महिला आणि मुलींसाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येऊन तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पाहणी करण्याबाबत सर्व तालुकास्तरीय समिती सदस्य, सचिव यांना सूचना देण्यात येतील. जिल्हास्तरीय समितीप्रमाणे तालुकास्तरीय समिती स्थापन करुन तालुकानिहाय १, २ व ३ असे ३-३ गणेश मंडळ यांना पुरस्कार देण्यासाठी तालुकास्तरीय समितीस सूचना देण्यात येतील. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व नागरिकांनी शांततामय वातावरणात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे. तर दि.२८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असून त्याच दिवशी मोहम्मद पैगंबर ईद ए मिलाद असल्यामुळे जातीय सलोखा राखून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी केले आहे.
..................
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांनी डी.जे., डॉल्बी, रँछो यांचा कमीत-कमी वापर करुन पारंपारिक वाद्यांचा जास्तीत-जास्त वापर करावा असे सांगत ध्वनी प्रदूषण व वायू (हवा) प्रदूषण कमीत कमी होईल याची खबरदारी सर्व मंडळांनी घेण्यात यावी. तसेच गणेश मंडळांच्या परिसरात पुरेशा लाईटची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही बसविण्याबाबत तयारी ठेवावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती ऐवजी स्थानिक माती, क्ले यांच्यापासून बनविलेल्या गणपती मुर्ती यांचा वापर करावा. वन-वे ट्राफिकबाबत निर्णय घेऊन रहदारीच्या ठिकाणी नियम व अटी प्रमाणे सर्व नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. तर गणेश मंडळांनी आपापल्या सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना सहभागी करुन घेऊन उत्सव साजरा करावा. सार्वजनिक गणेश मिरवणूकीत सर्व मंडळांनी एकत्र येऊन एकच मिरवणूक घेतली तर पोलिस बंदोबस्ताबाबत प्रशासनाला सहकार्य करावे. सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या परिसरात स्वच्छता, स्वच्छ पाणी, आरोग्याबाबत खबरदारी घ्यावी. शासन निर्णयात नमूद सर्व बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील जास्तीत-जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे व शांततेच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps