पाटील यांनी काढलेल्या भीमाशंकर दर्शन यात्रेस महिलांचा प्रतिसाद
पाटील यांनी काढलेल्या भीमाशंकर दर्शन यात्रेस महिलांचा प्रतिसाद
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - श्रावणमासनिमित्त आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यावतीने भीमाशंकर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेमध्ये महिलांनी सहभाग नोंदवित दि.५ सप्टेंबर रोजी आनंद लुटला.
तुळजापूर तालुक्यातील भाविक महिलांना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर देवस्थान येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात १ बस अशा ९ बसेसची सोय करण्यात आली.
यावेळी पाटील म्हणाल्या की, देवदर्शन एक निमित्त असून देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो. परंतू महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नसल्यामुळे मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते. तर महिलांमधून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात, त्या जो आनंद घेतात, त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणीत होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलीचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये सतत येत राहते असे नमूद केले. तर यंदाच्या या यात्रेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील ? मात्र महिलांनी इतका सुंदर सहलीचा आनंद लुटला. कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे. या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते ? हे पाहिल्याचे सांगितले. यावेळी भीमाशंकर प्रशासनाच्यावतीने अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.