धाराशिव शहरात १ ते ५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार दोन कोटी रुपयांची आकर्षक बक्षिसे
धाराशिव शहरात १ ते ५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार
दोन कोटी रुपयांची आकर्षक बक्षिसे
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने धाराशिव येथे ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या कुस्ती स्पर्धेचे आयोजक तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
धाराशिव लगत असलेल्या हातलाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, अर्जुन वीर काकासाहेब पवार, विजय बराटे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, विभागीय सचिव भरत मेकाले, तांत्रिक सचिव बंकट यादव, पैलवान संघटनेचे जिल्हा सचिव वामनराव गाते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, दि.१ ते ७ नोव्हेंबर दरम्यान धाराशिव शहरातील तुळजाभवानी स्टेडियम येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ९०० पहिलवान सहभागी होणार आहेत.
राज्यभरातील पहिलवानांसाठी पर्वणी असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दृष्टीने जिल्हा तालीम संघाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कुस्ती स्पर्धा गादी १० वजनी गट व माती १० वजनी गट अशा २० वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहेत. या गटातील ८६ ते १२५ वजनी गटातील स्पर्धकांची अंतिम महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. यासाठी गादी व माती गटातून १ - १ पहिलवान निवडण्यात येणार असून या दोन मल्लांमध्ये कुस्ती स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्पर्धेसाठी गादी माती गटातून प्रत्येकी ४५० मल्ल असे ९०० मल्ल कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत. तर २०० कोचेस येणार असून तांत्रिक सहाय्यक करणारे २५ व विविध पदाधिकारी मिळवून १५०० लोक ५ दिवस धाराशिवमध्ये मुक्काम करणार आहेत. यासाठी १० वजन काट्यांची व्यवस्था स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. तसेच या स्टेडियमध्ये ४० ते ५० हजार नागरिक बसतील अशी गॅलरी तयार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही स्पर्धा अतिशय मोठी असल्यामुळे बाहेरील नागरिक देखील लाखोंच्या संख्येने येणार असल्यामुळे गॅलरी व बाहेरच्या बाजूला असे ७ स्क्रीन बसविण्यात येणार असून यावर स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५वजन गटात होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
......................
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या मल्लाला ३० लाख रुपयांची कार बक्षीस म्हणून दिली जाईल. तर उप महाराष्ट्र केसरी पटकावणाऱ्या मल्लाला महिंद्र ट्रॅक्टर भेट दिले जाणार असून १८ बुलेट, हिरो होंडा व रोख रक्कम अशी २ कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
.........................
शरीरातील सर्व लॉजचे बुकींग
शहरातील सर्व लॉज व मंगल कार्यालयाचे बुकींग करण्यात येणार असून येथे मल्ल व अन्य महत्वांच्या व्यक्तींची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा तालीम संघाच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.