अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या मशिन्ससह टोळीचा पर्दाफाश - कुलकर्णीउमरगा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या मशिन्ससह टोळीचा पर्दाफाश - कुलकर्णी
उमरगा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - राज्य शासनाने बंदी घातलेला अवैधरित्या गुटखा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर राज्यातून येत आहे. गुटका आणणारे माफिया हे चोरमार्गाचा अवलंब करून अशा पद्धतीने जिल्ह्यात त्याचा पुरवठा करीत आहेत. मात्र उमरगा पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये धाड टाकून एक आरोपी, ९ नव्या, १ जुनी मशीन व चारचाकी वाहन जप्त केले आहे. ही कामगिरी उमरगा पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१८ सप्टेंबर रोजी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, उमरगा चौरस्ता येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेत शिवारामध्ये बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवैधरित्या गुटखा तयार करून साठा करून विक्री व्यवसाय करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची खात्री करून त्या ठिकाणी पाहणी करून त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांना माहिती देण्यात आली. बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पारेकर सपोनिकासार महिला पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस हवालदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोना सय्यद, कावळे, राऊत, कांबळे, पोलीस शिपाई उंबरे, मुळे, मते, भोरे सगर, सोनटक्के, बिराजदार व इतर २ पंच यांनी त्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले ९ नवीन तर १जूने मिक्सर मशीन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे सुपारी जरा गात सुगंधी तंबाखू व तयार पॅकिंग केलेला गोवा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरले टाटा टेम्पो ट्रक क्र. (एमएच- १३, सीयु - ५१२६ ) असा एकूण ४८ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अवैधरित्या व्यवसाय करणारे औसा तालुक्यातील किल्लारी येथील बसवराज दिलीप बिराजदार (वय २९) व उमरगा येथील संजय नागनाथ येलापुरे या दोन आरोपी विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुरनं ३२८, १८८, २७२, २७३ भादंवि सह कलम ५९, २६ (२) (आय), २६ (२) (४), २७ (३) (इ), (३०) (२) अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
...................
गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यापूर्वी शांतता समितीची बैठक घेऊन सर्व समाजातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तर या कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच जिल्ह्यातील चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. विशेष म्हणजे एक सीसीटीव्ही शहरासाठी ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी नागरिकांनी देखील एक सीसीटीव्ही रस्त्याच्या बाजूने लाववा. त्यामुळे पोलीस प्रशासन मदत करील. तर रस्त्यावरील चोरी व चोरट्यांना दहशत बसण्यास मदत होईल. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.