गौर व आळणी नाका येथील स्मृतीस्तंभ बांधण्यासाठी निधी द्यावा - दुधगावकर
गौर व आळणी नाका येथील स्मृतीस्तंभ बांधण्यासाठी निधी द्यावा - दुधगावकर
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील गौर येथील स्मारक दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी व धाराशिव तालुक्यातील आळणी नाका येथे स्मृतीस्तंभ बांधण्यास निधी मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२१ सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील १३ ठिकाणी शासनाने निधी दिलेला आहे. परंतू कळंब तालुक्यातील गौर येथील हुतात्मा स्मारक दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये तर धाराशिव तालुक्यातील आळणी येथील करोडगिरी नाका येथे स्मृतीस्तंभ बांधण्यासाठी ३० लाख रुपये निधी मिळणे गरजेचे आहे. या दोन्ही ठिकाणी निधी मिळण्यासाठी पूर्वीपासून मागणी असताना या दोन्ही ठिकाणी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.