ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन सायकल रॅलीचे आयोजन
ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन सायकल रॅलीचे आयोजन
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन पोलोच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हयात ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन सायकल रॅली जिल्हा प्रशासनाच्यावतीने १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
“ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन” चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी चौक ते वडगांव (सि) ते बावी ते बोरीमार्गे तुळजापूर येथील शिवाजी चौक ते परत तुळजापूर येथून बोरी ते बावी ते वडगांव (सि) ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील हुतात्मा स्मारक या प्रमाणे रॅलीचा मार्ग असणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालय ते वडगांव (सि) ते बावी ते बोरी मार्ग तुळजापूर येथील शिवाजी चौक असा 22 कि.मी.व परत 22 किमी असा एकूण 44 कि.मी. सायक्लोथॉनचा प्रवास असणार आहे.
सायक्लोथॉन रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी हे या सायक्लोथॉनचे नेतृत्व करणार आहेत. तसेच उस्मानाबाद स्पोर्टस अकॅडमीचे सायकलपटु, पोलीस दलातील जवान, प्रशासनातील अधिकारी, कॉलेजचे युवक सहभागी होणार आहेत.या सायकल रॅलीमध्ये अंदाजे २०० सायकलपटू सहभागी होतील. ऑपरेशन पोलो सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटुला प्रशासनाच्यावतीने टी-शर्ट, कॅप, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तसेच रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटू सोबत स्वत:ची सायकल व हेल्मेट असणे आवश्यक आहे.ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन रॅलीमधून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तुळजापूर येथील २ स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले होते. या २ स्वातंत्र सैनिकांना यावेळी मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे या ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन रॅलीमध्ये युवक-युवती, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होण्यासाठी धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे कार्यालयीन वेळेमध्ये ११ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपली नांव नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. ओंबासे यांनी केले आहे.