परंडा येथे वाजत-गाजत गणपतींचे विसर्जन
परंडा येथे वाजत-गाजत गणपतींचे विसर्जन
परंडा दि.३० (प्रतिनिधी) - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषणांसह ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. शहरात १५ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी ९ मंडळांनी मिरवणूक काढून जल्लोषात विसर्जन केले. तर ६ मंडळांनी जाग्यावरच विसर्जन केले.
गणपती विसर्जनासाठी भोत्रा रोड, रघुनाथ आड, देशमुख विहीर, सोमवार गल्ली, गाव तळे यांच्यासह ३ कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली १३ गार्ड नगर परिषदचे ६ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. जय भवानी गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, म्हसोबा गणेश मंडळ, जय हनुमान गणेश मंडळ, गणेश मंडळ, नरसिंह गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, लाल गणेश मंडळ, नागेश्वर गणेश मंडळ या गणेश मंडळांनी मिरवणूक काढली. तर हंसराज गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ, समर्थ गणेश मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ, नरवीर गणेश मंडळ या ६ गणेश मंडळांनी जाग्यावरच विसर्जन केले. तसेच तालुक्यात परंडा पोलिस हद्दीत ७० मंडळानी गणपतीची प्रतिष्ठापणा केली होती. यामध्ये ६० मंडळ परवानाधारक होते. उपविभागीय अधिकारी गौरीशंकर हिरेमेट, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुपोनि कविता मुसळे, सपोनि शंकर सुर्वे, उपनिरीक्षक किरण घोंगडे यांच्यासह ३० पोलिस अंमलदार, ४ पोलिस अधिकारी, ४५ होमगार्ड व जिल्हा पोलिस दलाची १ तुकडी तैनात करण्यात आली होती. परंडा येथे गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत काढण्यात आली.