४ हजारांची लाच घेणाऱ्या २ इंजिनीअर्संना अटक
सेवानिवृत्त महिला शिपायाचे अंशराशीकरण व उपदानाची रक्कम काढण्यासाठी ४ हजारांची लाच घेणाऱ्या अभियंत्यांना अटक
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिपाई असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याची शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या अभियंत्याने व एका सेवानिवृत्त अभियंता संबंधित महिलेच्या मुलाकडून ४ हजार रुपयांची लाच स्विकारली. विशेष म्हणजे आज गणेश विसर्जन असताना देखील लाच खाण्यासाठी चटावलेल्या लाचखोरांना रंगेहात पकडून अटक केली आहे. आज सर्वत्र गणेश विसर्जन धुमधडाक्यात सुरू असताना अवैध व काळ्या धंद्याचे विसर्जन करण्याऐवजी हरामखोर मंडळी अशा प्रकारे लाच घेऊन जनतेची लूट करीत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील एका ३० वर्षीय तक्रारदार यांची आई या जिल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी मिलिंद सुर्यकांत कांबळे (वय- ४५ वर्षे) वरिष्ठ सहाय्यक लेखा, पंचायत समिती, धाराशिव ( वर्ग -३),
हनुमंत गोपाळ पवार (वय- ६९ वर्षे) सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, रा. काकडे प्लॉट धाराशिव ( खाजगी व्यक्ती ) यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम दि.२८ सप्टेंबर रोजी आरोपी कांबळे यांनी लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली. या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (मो.न.9923023361) यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्ष सिध्दाराम म्हेत्रे (मो.न.9594658686) यांनी सापळा रचून केली. या सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे,सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य,नागेश शेरकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव कार्यालय फोन क्रमांक 02472 222879 व टोल फ्री क्रमांक-1064 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.