गाथा मुक्ती संग्रामाची नाटक २५ सप्टेंबरपासून सादरीकरण होणार - शिंगाडे
गाथा मुक्ती संग्रामाची नाटक २५ सप्टेंबरपासून सादरीकरण होणार - शिंगाडे
धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढी पुढे मांडणारे दोन अंकी नाटक गाथा मुक्ती संग्रामाची हे नाटक जिल्ह्यामध्ये दि.२५ सप्टेंबरपासून सादर करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२२ सप्टेंबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष सागर चव्हाण, कोषाध्यक्ष सुगत सोनवणे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. मात्र मराठवाडा विभाग निजामाच्या हैद्राबाद संस्थानात होता. या निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्मे दिले. सर्वत्र उठाव झाला व त्यानंतर हैद्राबाद संस्थानांमधून मराठवाडा भारतात विलीन झाला. हा इतिहास नेमका काय आहे, हैद्राबादपासून मराठवाडा मुक्त कसा झाला ? याचा सर्व धगधगता इतिहास नाटकाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात सादर करण्यात येणार आहे. गाथा मुक्ती संग्रामाची हे दोन अंकी नाटक सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे सादरीकरण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दि.२५ सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात तर दि.२६ सप्टेंबर रोजी कळंब येथील मोहेकर महाविद्यालयांमध्ये तसेच २७ सप्टेंबर रोजी धाराशिव येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तर दि.२९ सप्टेंबर रोजी भूमीतील सावित्रीबाई फुले सभागृहात तसेच दि.३० सप्टेंबर रोजी वाशी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात तर दि.८ ऑक्टोबर रोजी लोहारा येथील सप्तरंग मंगल कार्यालयात तसेच दि.९ सप्टेंबर रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयात तर दि.१० ऑक्टोबर रोजी परंडा येथील गोपीनाथ मुंडे सभागृहात तसेच दि.११ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर व दि.१२ ऑक्टोबर रोजी अर्धापूर येथे सादर करण्यात येणार आहे. या नाटकांचे प्रयोग सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सादर करण्यात येणार आहेत. तसेच या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे नाटक पूर्णपणे निःशुल्क असून ते पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिंगाडे यांनी केले आहे.